पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत 71 टक्के तरुण मतदार
पुणे – सातारा, पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांमध्ये 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. संपूर्ण विभागात 1 कोटी 90 लाख 94 हजार 159 मतदार आहेत. विभागातील मतदार यादीमध्ये 20 ते 29 वयोगटातील तरुणांचे मतदार यादीतील प्रमाण हे सुमारे 71 टक्के आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तरुणांचे मते निर्णायक ठरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळच्या मतदार यादीची तुलना करता 18 ते 19 वयोगटातील तरुण मतदारांची 90 हजार 782 नव्याने नोंद झाली असून लोकसभेशी तुलना करता ही वाढ 24 टक्के आहे. एकूण त्या वयोगटातील मतदारांशी तुलना करता हे प्रमाण 43.29 टक्के आहे. तसेच, 20 ते 29 वयोगटातील 1 लाख 65 हजार 72 नव्या मतदारांची नोंद झाली असून लोकसभेशी तुलना करता ही वाढ 4.60 टक्के इतकी आहे. मतदार यादीमध्ये तरुणांचे प्रमाण हे 71 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात 98.51 टक्के मतदारांना फोटो ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे मतदान यादीत नाव आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्र नाही ते निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या 11 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करू शकतात. पुणे विभागाचा मतदार यादीचा पुरुष-स्त्री प्रमाण 935 आहे.
पुणे विभागात एकूण 1 लाख 28 हजार 518 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी दिव्यांग मतदारांची संख्या 94 हजार 292 होती. त्यामध्ये 34 हजार 226 ने वाढ झाली आहे. जिल्हा परिषद कार्यालयांनी दिव्यांग उन्नत अभियानांतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे. तसेच, अपंग कल्याण आयुक्तालयाकडून सांख्यिकीय माहिती प्राप्त करून सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे. विभागात एकूण 10 हजार 266 मतदान स्थळे असून आजअखेर व्हिल चेअरची उपलब्धता 8 हजार 110 आहे. तसेच प्रत्येक मतदार स्थळावर किमान 1 व्हिलचेअर उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.