पुणे – महाराष्ट्र राज्य युवा सेना आणि किरण साळी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या “युवा करंडक’ राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 24 आणि दि. 25 डिसेंबर रोजी व्हिजन क्रिकेट ऍकॅडमी, सिंहगड रोड येथे होणार आहे.
राज्य तसेच पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 32 क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. टेनिस बॉलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार आहेत, अशी माहिती आयोजक आणि महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे सहसचिव किरण साळी यांनी दिली.
स्पर्धेत एकूण दीड लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्राचे रणजीपटू, माजी क्रिकेटपटू श्रीकांत जाधव आणि पुणे अप्पर पोलीसचे नितेश घट्टे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोने, गजाजन थरकुडे आणि रमेश कोंडे यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहीर यांच्या उपस्थितीत होणार आहे.