बारामती – येथील दूध संघ वसाहतीतील एका 29 वर्षीय तरुणाच्या करोना चाचणीचा मंगळवारी (दि. 26) रात्री आलेले अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर बुधवारी (दि. 27) सकाळी आलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान, अवघ्या 12 तासांत दोन वेगवेगळे अहवाल आल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.
संबंधित तरुणाचा करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याचा कोणताही प्रवास संदर्भ नसल्याने बारामतीकरांनी याची काळजी घेण्याची गरज आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलने करवून घेतलेल्या चाचणीमध्ये काही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, याच तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या तरुणास कोणतीही लक्षणे नव्हते. त्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनास धक्का बसला होता.
अर्थात, अहवाल येण्यास उशीर होत असल्याने प्रशासनाने त्याची मंगळवारी पुन्हा चाचणी केली. त्याचा अहवाल सकाळी निगेटिव्ह आली. त्यामुळे रात्री पॉझिटिव्ह आलेला तरुण आता निगेटिव्ह आहे. त्यामुळे एका अर्थाने तो बारामतीकरांसाठी दिलासाच आहे. तरीदेखील त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा कोविड-19 चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली.
तालुक्यातील लोणी भापकर येथील 70 वर्षीय करोना संक्रमित वृद्ध महिलेच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या मुलाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून संपर्कातील इतर आठ जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
बारामतीकर फिरताहेत उजळमाथ्याने
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बारामतीकर ज्या उजळमाथ्याने व अगदी बिनदिक्कत सगळीकडे फिरत आहेत, अनेकजण काळजी घेत नाहीत, मास्कही लावत नाहीत त्यांच्यासाठी हा करोना रुग्ण एक मोठा धडा आहे. प्रशासनाने प्रयत्नाची शर्थ करीत व त्याला नागरिकांनीही तेवढीच समर्थपणे साथ देत करोना आजवर रोखलेला आहे. त्यामुळे करोनाच्या आड लक्षणे नसलेले कॅरिअर शहरात असतील याची काळजी सर्वांनीच करण्याची गरज आहे.