महिलेची फसवणूक ः सायबर सेल, आळंदी पोलिसांची कामगिरी
काळजी घेण्याचे पोलिसांकडून आवाहन
नागरिकांनी पैसे काढताना आपले एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नये. तसेच, एटीएम आणि बॅंकेची गोपनीय माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीला सांगू नये. एटीएम मशीनमध्ये पिन नंबर टाकताना कोणालाही दिसू नये, याची काळजी घ्यावी. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पिंपरी – एटीएम मशीमधून दुसऱ्या खात्यावर पैसे पाठविण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून 40 हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस व आळंदी पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीने महिलेच्या खात्यातून 40 हजार रुपये काढले व तसेच 39 हजार 518 रुपयांचे दागिने खरेदी केले.
श्रवण सतीश मिनजगी (रा. भीमा कोरेगाव) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सलीमाबी कादर इनामदार (वय 60, रा. च-होली खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरी-चिंचवड सायबर सेल आणि आळंदी पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करत श्रवण याला अटक केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी इनामदार आळंदी येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गेल्या होत्या. एटीएम सेंटरमध्ये थांबलेला श्रवण याने त्यांना मदत करण्याचा बहाणा करत सदर महिलेकडून एटीएम कार्ड घेतले. एटीएम कार्डचा पिन नंबर विचारून एटीएम मशीन हॅक झाल्याचे सांगितले. दरम्यान श्रवण याने इनामदार यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून स्वतःजवळील दुसरे एटीएम कार्ड त्यांना दिले. त्यामुळे इनामदार पैसे ट्रान्सफर न करता निघून गेल्या. त्यानंतर श्रवण याने इनामदार यांच्या कार्डद्वारे 40 हजार रुपये काढले. तसेच भीमा कोरेगाव येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून 39 हजार 518 रुपयांचे सोने खरेदी केले. अशी एकूण 78 हजार 518 रुपयांची श्रवण याने इनामदार यांची फसवणूक केली. श्रवण हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात शिक्रापूर व अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक आर व्ही चौधर, पी. व्ही जाधव, निलेश बोडके, स्वाती लामखडे, कोंकेरी, अतुल लोखंडे, भास्कर भारती, मनोज राठोड, नितेश बच्चेवार, प्रदीप गायकवाड, पोपट हुलगे, नाजुका हुलवळे, आशा सानप यांच्या पथकाने करुन सराईत आरोपीस गजाआड केले आहे.