नागठाणे – येथील पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत दुचाकीने दुभाजकाला दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. रोहित प्रकाश गिंडे (वय 27, रा. कुपवाडरोड मिरज,जि. सांगली) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित गिंडे हा युवक दि. 23 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास साताराहून कराडच्या दिशेने जात होता. यावेळी वळसे गावच्या हद्दीत महामार्गावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो दुचाकीसह दुभाजकावर जोरदार आदळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीची धडक इतकी भीषण होती की रोहितचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा केला. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय देसाई करत आहेत.