25 लाखांच्या खंडणीसाठी नागठाण्यात युवकाचा खून

दत्त जयंतीदिवशीच केला घात

सातारा/ नागठाणे – पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय 17, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागठाणे (ता. सातारा) येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आशिष बन्सी साळुंखे, साहिल रुस्तूम शिकलगार (दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (रा. मोळाचा ओढा, सातारा) या तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बोरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने केली.

याबाबत अधिक माहिती अशी, तेजस जाधव याला व्यायामाची आवड होती. तो नेहमीप्रमाणे 11 डिसेंबर 2019 रोजी नागठाणे येथे व्यायामासाठी दुचाकीवरून गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्याच्या घरातल्यांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.

दरम्यान, आष्टे गावापासून जवळच तेजसची दुचाकी तो बेपत्ता झाला त्याच दिवशी सापडली होती. त्याठिकाणी दुसऱ्या एका गाडीची चावीसुद्धा आढळून आली होती. हा सारा प्रकार वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलिसांना सांगितला होता. दोन महिन्यांपासून तेजसचा सर्वजण शोध घेत होते. याचवेळी एकाचा तेजसच्या वडिलांना फोन आला. “तुमच्या मुलाचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे,’ असे त्यांना सांगण्यात आले. या फोनची माहिती त्यांनी बोरगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आशिष साळुंखेला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याकडून फारशी माहिती उपलब्ध न झाल्याने त्याला सोडून देण्यात आले.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी या खून प्रकरणाचा उलगडा झाला. आशिष साळुंखे आणि त्याचे मित्र साहिल शिकलगार व शुभम जाधव यांना पोलिसांनी त्याब्यात घेतले. दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. शुभमच्या वडीलांनी महामार्गालगत असलेली त्यांची जमीन विकली असून त्यातून त्यांना बक्कळ पैसे मिळाल्यानेच तेजसचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी उकळण्याचा संशयितांचा बेत होता.

त्यानुसार त्यांनी दोन महिन्यांपूर्वी शुभमला गोड बोलून त्याचे अपहरण केले. मात्र, खंडणी मिळत नसल्याचे लक्षात येताच संशयितांनी शुभमचा दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह विहरीत टाकून दिल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, फौजदार प्रसन्न जऱ्हाड, हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबिन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नितीन गोगावले, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, अजित कर्णे, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत यांनी केली.

गतवर्षी गावात दत्त जयंतीचा कार्यक्रम असल्याने गावातील लोक कार्यक्रमाच्या नियोजनात गुंतल्याचा फायदा घेण्याचे संशयितांनी ठरवले होते. शुभमला गोड बोलून गावाबाहेरच्या पाण्याच्या टाकीजवळ बोलवून घेतले व त्यानंतर त्याचे अपहरण केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.