वाठार स्टेशन – वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोधेवाडी येथील घाटात सोमवारी दि. 20 जानेवारी 2020 रोजी रात्रीच्या वेळेस महिमानगड येथील सिुमत सुरेश मोरे (वय 30, सध्या रा. सायन, मुंबई, मूळ गाव महिमानगड) या युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. सुमित मोरे यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने त्याचा मृतदेह अर्धवट जयळालेल्या अवस्थेत होता. तसेच त्ययाची मारूती कारही जाळल्याचे आढळले.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित मोरे हा युवक मुंबई येथे राहत असून तो बॉडी फिटनेस प्रोटीन पावडर विक्रीचा व्यवसाय करीत होता. दि. 8 जानेवारी रोजी तो आपल्या गावी महिमानगड (ता. माण) येथे जमिनीची कागदपत्रे काढण्यासाठी आला होता. त्यानंतर दि. 16 जानेवारी रोजी आपल्या कागदपत्रांचे काम करून परत मुंबईला गेला.
दरम्यान, आज सकाळी बोधेवाडी (ता. कोरेगाव) येथील घाटमाथ्यावर सुमितचा खून करून सोबत असणारी कार (एमएच01 डीबी 7105) अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. समितचा मृतदेह पिंपोडे बुद्रुक येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. सुमितचे मामा जितेंद्र श्रीरंग कांबळे वय 45, रा. उकिर्डे, ता. माण) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.