बीड – मेंढ्या खरेदी-विक्री व्यवहारातून व पैशाच्या देवाण-घेवाणीवरून तरूणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात घडली आहे. संतोष बळीराम दवकते (वय32) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील वांगी तलावात दोन दिवसांपूर्वी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने खून करून मृतदेह तलावात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले होते. मृतदेहाची ओळख पटवून तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी अवघ्या 24 तासात खुनाचा उलगडा करून मृतदेहाची ओळख पटवीली. मेंढ्या खरेदी-विक्री व्यवहारातून व पैशाच्या देवाण-घेवाणीवरून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी सिरसाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.