-ग्रामीण भागात 31 ते 40 वयोगटातील 55 हजार 441 रुग्ण
- 21 ते 30 वयोगटातील 50 हजार 848 जणांना बाधा
पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक करोना रुग्ण संख्या 31 ते 40 वयोगटातील आहे. या वयोगटातील 55 हजार 441 जणांना लागण झाली असून हे प्रमाण 25.9 टक्के आहे. त्याखालोखाल 21 ते 30 या वयोगटातील 50 हजार 848 जण बाधित आहेत. दरम्यान एकूण करोना बाधितांपैकी 64.5 टक्के पुरूष, तर 35.5 टक्के स्त्रियांचे प्रमाण आहे.
दि. 5 मेपर्यंत ग्रामीण भागात 1 लाख 38 हजार 104 पुरुष आणि 76 हजार 6 महिलांना करोनाची लागण झाली. पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक होते, तर यावेळी तरुणांना मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. 41 ते 50 या वयोगटातील 33 हजार 382 जणांना करोनाची लागण झाली, हे प्रमाण 15.6 टक्के आहे. 51 ते 60 वयोगटातील 24 हजार 242 जणांना लागण झाली असून हे प्रमाण 11.3 टक्के आहे.
61 ते 70 वयोगटातील 16 हजार 597, 11 ते 20 वयोगटातील 16 हजार 95, 1 ते 10 वयोगटातील 8 हजार 400, 71 ते 80 वयोगटातील 7 हजार 12, 81 ते 90 वयोगटातील 1 हजार 671, एक वर्षापेक्षा लहान बाळांना 249, 91 ते 100 वयोगटातील 211 जणांचा समावेश आहे. तर शंभरपेक्षा जास्त वय असलेल्या 12 व्यक्तींना करोना झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमुद आहे.
लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण 4 टक्के
ग्रामीण भागात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण 4 टक्के आहे. 1 ते 10 वयोगटातील 8 हजार 400, तर एक वर्षापेक्षा कमी वय असलेले 249 बाधित सापडले आहेत.