वाघोली : वाघोलीत पुणे-नगर महामार्गालगत दुतर्फा नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकींवर संबंधितांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असल्याचे नुकतेच समोर आले. असे असताना गुरुवारी दुपारी एका दुचाकीवर टोइंग व्हॅनद्वारे कारवाई करीत असताना एक तरुण दुचाकीला लटकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडीओबाबत प्रतिक्रिया देताना नागरिकांची नाराजी उफाळून बाहेर येत असून दुचाकीसह अडथळा ठरणाऱ्या इतर वाहनांवर, डंपरवर, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
नागरिकांना वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीच्या दृष्टीने पुणे-नगर महामार्गावर वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग करून वाघोलीत टोइंग व्हॅनद्वारे कारवाई केली जात आहे. सद्यस्थितीत हि कारवाई करीत असताना चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असल्याचे राष्ट्रवादीचे प्रकाश जमधडे यांनी एक दिवसापूर्वीच उघड करून पोलीसांना सुधारणेबाबत निवेदनही दिले होते.
अधिकाऱ्यांनी सदर व्यक्ती उपस्थित असल्यास कारवाई करू नका, काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. एक दिवस जात नाही तोच वाघोलीत टोइंग व्हॅनद्वारे कारवाई करीत असताना एक तरुण दुचाकीला लटकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओबाबत कारवाईवर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून टोइंग व्हॅनवरील मुलांच्या वर्तनाबाबतही नाराजी व्यक्त केली आहे.
दुचाकींवर टोइंगद्वारे होणारी कारवाई वादाच्या भोवऱ्यात; कारवाईबाबत आंदोलनाचा इशारा
पुणे-नगर महामार्गालगत वाघोलीमध्ये वाघेश्वर चौक ते बकोरी फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंगमधील वाहनांवर लोणीकंद वाहतूक विभागाच्या वतीने टोइंगद्वारे कारवाई केली जात असताना केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह केले जात असून कारवाईबाबत सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे हवेली तालुका उपाध्यक्ष प्रकाश जमधडे यांनी दिला आहे.
पोलीस अधिकारी म्हणाले ….
बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाकडून नो पार्किंगमधील वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत असून ती पुढेही सुरूच राहील. चारचाकी वाहनांवर टोइंग कारवाई करण्यासाठी वाहन उपलब्ध झाल्यावर कारवाई केली जाईल तोपर्यंत नो पार्किंगमधील चारचाकी वाहनांवर ऑनलाईन दंडाची कारवाई केली जात आहे.नागरिकांना त्रास देण्याची नाही तर सहकार्य करण्याची भूमिका वाहतूक पोलिसांची आहे. महामार्गालगतच्या व्यावसायिकांना पार्किंगबाबत नोटीसा दिल्या गेल्या आहेत. कारवाईमध्ये काही वाहतूक कर्मचारी किंवा कोणीही चुकीची कारवाई केली असेल, ज्याच्यासोबत चुकीची कारवाई झाली असेल त्यांनी मला संपर्क साधावा त्याबाबत शंभर टक्के योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
संबंधित तरुण जेवण करीत बसला होता. कारवाईवेळी वाहन दुसरीकडेच नेले जात असल्याची भीती वाटल्याने तो लटकला होता. याबाबत या तरुणाला विचारून शहा निशा करण्यात आली आहे आणि टोइंगवरील संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
गजानन जाधव, एपीआय वाहतूक विभाग