लाखणगाव- पारगाव (ता. आंबेगाव) येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात भीमाशंकर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
युवा महोत्सवांतर्गत मेहंदी स्पर्धा, पाककला, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, हस्त कला, पोस्टर स्पर्धा, स्कॉलर ऑफ दि कॉलेज, स्वरचित काव्य वाचन, वक्तृत्व वाद विवाद, हस्ताक्षर स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रम प्रसंगी भीमाशंकर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, चंद्रकांत ढगे, बाबासाहेब खालकर, अशोक घुले, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, रामचंद्र ढोबळे, ज्ञानेश्वर अस्वारे, विलास लबडे, रुपेश लबडे, बी. डी चव्हाण यांच्यासह विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. प्रदीप वळसे पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. तसेच उपजत गुणांचा विकास व्हावा.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा. यासाठी युवा महोत्सवातील विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. मेहंदी स्पर्धेतून कौशल्य व्यावसायिक विकास करता येईल. तसेच पाककला स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या व्यवसायाला दिशा मिळेल. पाककला स्पर्धेत मुलींप्रमाणेच मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. ही एक चांगली बाब आहे. परीक्षक म्हणून राजश्री देवदत्त निकम, नागापूर गावाच्या सरपंच सुजाता रिठे, प्राचार्या सोनल कानडे यांनी काम पाहिले. प्रा. मनीषा बढे यांनी निवेदक म्हणून काम केले. प्रा. पूनम भोजने यांनी आभार मानले.