आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा ः रुग्णालयाशी संपर्क करून घेतली माहिती
अडीच वर्षे वाढविले केस
पिंपरी – डोक्यावरील केस टिकून राहावेत, केसांमुळे चेहऱ्याला मिळणारे सौंदर्य अजून खुलावे, यासाठी सर्वचजण प्रयत्न करत असतात. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील एका तरुणाने आपल्या डोक्यावरील केस कॅन्सरच्या रुग्णांसाठी दान केले. यासाठी त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा केली आणि संबंधित सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. केसांची चांगली निगा राखून केस खूप वाढविले आणि जेव्हा ते देण्यायोग्य झाले तेव्हा ते कॅन्सर रुग्णालयास दान केले. थेरगाव येथील राहुल सरवदे या तरुणाने हा वेगळा उपक्रम राबवून इच्छा असल्यास कोणत्याही पद्धतीने गरजूंची मदत करता येऊ शकते. हे दाखवून दिले.
कॅन्सरच्या रुग्णांवर केमोथेरपी केल्यावर त्यांच्या डोक्यावरील केस जातात. तेव्हा समाजात वावरत असताना त्यांचा आत्मविश्वास कमी होतो म्हणून त्यांना केसाचा खर्चिक टोप घालावा लागतो. याबाबत विचार केल्यावर अशा रुग्णांसाठी आपण आपले केस दान करू शकतो, अशी कल्पना राहुल यांच्या मनात आली. याबाबत त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती काढण्यात सुरुवात केली असता “मदत’ नावाची मुंबईतील संस्थेबाबत माहिती मिळाली. ही संस्था कर्करोगावर उपचार देणाऱ्या टाटा रुग्णालयाशी सलंग्न असून दान केलेल्या केसाचे टोप तयार करून रुग्णांना मोफत देत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधून केस दान करण्याबद्दल माहिती घेतली.
मदत या संस्थेकडून राहुल यांना सांगण्यात आले होते की, केस 12 इंच ते फुटभर असावेत. त्यानंतर राहुल यांनी तब्बल अडीच वर्षे केस वाढवले. केस चांगले वाढावेत, यासाठी केसांची चांगली निगा राखली. अखेर अपेक्षेनुसार केस मोठे झाल्यानंतर आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून “मदत’ या संस्थेला केस कुरियरद्वारे पाठवले. यानंतर संस्थेकडून राहुल यांना प्रशंसापत्र पाठविण्यात आले. दैनिक “प्रभात’शी बोलताना राहुल यांनी सांगितले की, मदत फक्त आर्थिक स्वरूपातच करता येते, असे काही नाही. इच्छा असल्यास गरजूंचा मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत. या संस्थेला केस दान केल्यावर निश्चित कर्करोगींना फायदा होतो. मी माझे केस कर्करोगींसाठी दान केल्याचा मला अभिमान आहे. इतरांनी देखील या कर्करोगींसाठी केस दान करावेत.