गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी युवकास अटक

पाटण पोलिसांची कारवाई; दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

मोरगिरी/पाटण -बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी चाफळ विभागातील जंगलवाडी (ता. पाटण) येथील जोतीराम उर्फ सागर दत्तात्रय शितोळे (वय 26) या युवकाला पाटण पोलिसांनी नवीन बसस्थानक परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटण न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी दिली. याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बेकायदेशीररित्या पिस्तुल घेवून एक युवक शुक्रवारी दि. 17 रोजी पाटण येथे येणार असल्याची माहिती पाटणचे उपअधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली होती.

त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस हवालदार राजेंद्र पगडे, मुकेश मोरे, अजित पवार, उमेश मोरे, प्रशांत माने या पथकाने पाटण येथील नवीन बसस्थानक परिसरात सापळा लावला. हा युवक पाटण येथील नियत बारनजीक  सायंकाळी साडेसातच्या सुमारास आला असता त्याच्यावर पोलीसांनी तात्काळ झडप घालून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी गावठी बनावटीच्या पिस्टलसह तीन जिवंत काडतुसेही जप्त केली. त्याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या युवकावर यापूर्वी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दोन ते तीन वर्षापूर्वी बिहार येथील एका व्यक्तीकडून हे पिस्तुल त्याने खरेदी केले होते. गावात विरोधक जास्त असल्याने स्वसंरक्षणासाठी पिस्तुल तो बाळगत असल्याची माहिती युवकाने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सपोनि चंद्रकांत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी. व्ही. पाटील करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.