तरुणाई आणि बेरोजगारी

तरुणाईमुळे येत्या 2030 आणि 2050 या कालावधीत आपल्या देशाचे सरासरी वय हे 35 वर्ष असणार आहे. यामुळे जग भारताकडे महासत्ता बनू पाहणारे राष्ट्र म्हणून पाहत आहे. जगाला जे कळाले, ते या तरुणाईला कळले का? आजमितीस देशभरात वाढती बेरोजगारी हा विषय गंभीर बनत चालला आहे. ही वाढती बेरोजगारी का, हा प्रश्‍नही महत्त्वाचा आहे.

सर्वच राजकीय पक्षांच्या राजकारणात आज विकास हाच महत्त्वाचा घटक आहे. मग ही बेरोजगारांची संख्या का वाढते आहे? या विकासगंगेबरोबर शासनकर्त्यांनी या बेरोजगारीचा विचार केला आणि अभ्यासगट स्थापून ती ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न केले, याचाही उल्लेख करावा लागतो. वाढत्या लोकसंख्येचे प्रमाण पाहता ही विषमता आणि दरी आणखी मोठी झाली. ती एवढी मोठी झाली की आज देशांतर्गत अनेक चळवळी, मोर्चे, आंदोलने, हिंसाचार यावर नजर टाकली तर हे प्रमाण लक्षात येईल. कारण यात या बेरोजगार तरुणाईचाच सहभाग आहे, हे मान्य करावे लागेल.

विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकारण्यांना या बेरोजगारीत स्वारस्य आहे का? हाही विचार येतो. दोन-तीन दशकांचे अर्थसंकल्प आणि योजनांवर नजर टाकली तर प्रत्येक वेळी सरकार कोणतेही असो, प्रत्येकानेच या तरुणाईला आणि बेरोजगारीला हटविण्यासाठी भरघोस तरतूद केल्याचे आपण पाहतो. आजही सॉफ्ट स्किल, स्किल इंडिया, स्टॅंड अप, स्टार्ट अप या आणि इतरही अनेक प्रत्येक राज्याच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अनेकविध प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान या प्रशिक्षणाचा तरी खर्च झाल्याचे आपण पाहतो. जर योजना आहे, तरतूद आहे, निधी खर्च होतोय,तर मग ही बेरोजगारी कमी का होत नाही? हा मुद्दा राहतोच. उद्योग व्यवसायांचा विचार केला तर त्यांचीही फार चांगली प्रतिक्रिया नाहीच. लहान-मोठ्या प्रत्येक आस्थापनेत 35 ते 40 टक्के इतका शॉर्ट फॉल आहेच. मग तो अगदी हेल्पर ते स्किल वर्कर ते ऑफिस स्टाफपासून ते मॅनेजरपर्यंत. प्रत्येक आस्थापना ही स्वयंपूर्ण आणि समाधानी नाहीच, हे सत्य आहे. म्हणजेच बेरोजगारी वाढतेय आणि दुसऱ्या बाजूला उद्योगांनाही मनुष्यबळाची कमतरता आहे. मग पाणी कुठे मुरते, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

मुळातच आपल्याकडील उद्योगांची निकड आणि आपली शैक्षणिक पध्दती व त्यातून निर्माण होणारे मॅनेजर्स, इंजिनीअर्स यांची सांगड आणि परिपूर्णता हे कधीच मॅच होऊ शकत नाही. तरुणाईच्या उत्साहाचे, जल्लोषाचे रुपांतर प्रॉडक्‍टिव्हिटीत करायचे असेल तर उद्योगांची निकड, बदलती पार्श्‍वभूमी, येणारे तंत्रज्ञान याचबरोबर गुणवत्ता आणि आधुनिकता याचा वार करून प्रॅक्‍टिकल अभ्यासक्रमांचा, प्रशिक्षणाची रचना करणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टिने पावले उचलणे गरजेचे आहे.

– भगवान केशव गावित

Leave A Reply

Your email address will not be published.