नवी दिल्ली – राज्यसभेतील गोंधळांच्या संबंधात तृणमुल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रियन यांनी काल सरकारला आठ प्रश्न विचारणारा व्हिडीओ प्रसारीत केला होता. आज त्यांनी आणखी एक व्हिडीओ जारी करून थेट पंतप्रधान मोदींनाच सवाल उपस्थित केला आहे.
राज्यसभेत घटना दुरूस्ती विधेयके सादर करण्यात आलेली असतानाही मोदी सभागृहात का उपस्थित राहिले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या आधीचे पंतप्रधान अशा वेळी आवर्जून उपस्थित राहात असत असा दाखलाही त्यांनी दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की सरकारच्या मंत्र्यांना मी काल आठ प्रश्न विचारले होते, त्यापैकी एकाचेही उत्तर आले नाही. याचे मला काहीच आश्चर्य वाटले नाही कारण त्यांच्याकडे याची उत्तरे नाहीत याची मला कल्पना होती. त्यामुळे आता मला तुमच्या बॉसलाच प्रश्न विचारायचा आहे असे नमूद करीत ओब्रियन यांनी मोदींना उद्देशून सवाल उपस्थित केले.
तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि देवेगौडा हे राज्यसभेतील घटना दुरूस्ती विधेयकाच्यावेळी राज्यसभेत उपस्थित राहिले होते व त्यांनी चर्चेत भाग घेतला होता. मग तुम्ही संसदेतून गायब का झालात असा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला आहे.
तुम्ही संसद अधिवेशनाला दांडी का मारता? पंतप्रधान तुम्ही कोठे आहात? असे प्रश्न त्यांनी मोदींना विचारले आहेत. तुम्ही संसदेची चेष्टा चालवली आहे असेही ओब्रियन यांनी मोदींना सुनावले आहे. तुम्ही आणि तुमचे सरकार संसदेला आणि लोकांना उत्तरदायी आहात.
आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना तुमचे मंत्री उत्तर देऊ शकत नसतील तर तुम्ही त्याची उत्तरे द्या… युवर टाईम स्टार्टस नाऊ ! सरकारवर पेगॅसस हेरगिरीचे उपकरण वापरल्याचा आरोप आहे. त्यावर चर्चा करा आणि चौकशीचा आदेश द्या अशी विरोधकांची मागणी आहे. पण सरकारने ही चर्चा सभागृहात उपस्थित करू दिली नाही आणि चौकशीचाही आदेश दिला नाही.
त्यावरून विरोधक सध्या आक्रमक झाले आहेत. त्यात डेरेक ओब्रियन सरकारला रोज नवीन व्हिडीओ जारी करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.