दि.14 मे “झिरो शॅडो’ दिन
पुणे – असे म्हणतात, की आपली सावली आपली पाठ कधीही सोडत नाही. पण, येत्या दि. 14 मे रोजी हीच सावली तुमची-आमची पाठ सोडणार असून हा भौगोलिक अविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. वर्षातून दोन वेळा येणारा “झिरो शॅडो’ दिन यावर्षी पुण्यात दि.14 मे रोजी होणार आहे. या दिवशी सूर्य आपल्या डोक्यावर असताना भरदुपारी बारा वाजता सावली गायब होणार आहे.
पुण्यासह राज्यातील नागरिकांना टप्प्या-टप्याने हा दिवस अनुभवता येणार आहे. राज्यातील नागरिकांना 26 मेपर्यंत याचा अनुभव घेता येऊ शकणार आहे. पृथ्वीवर मकरवृत्ताच्या उत्तरेकडेच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो. परंतू या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो.
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण होते. सुमारे 23 डिसेंबर ते 21 जूनदरम्यान सूर्याचे उत्तरायण असते, तर त्यानंतर दक्षिणायण सुरू होते. यादरम्यान दोन दिवस असे येतात, की मध्यान्हाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्यावेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावलीबरोबर त्याच्या पायाखाली असते आणि काही वेळासाठी सावली आपली साथ सोडते.