स्वतःचं मत स्वतःलाच नाही!

आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा पर्याय अनेक दिग्गज नेत्यांनी निवडला आहे खरा; पण यामुळे या नेतेमंडळींना आपल्या कुटुंबाचीच मते मिळणार नाहीयेत. इतकेच नव्हे तर त्यांचे स्वतःचे मतही त्यांना स्वतःला देता येणार नाहीये. त्यामुळे इतर मतदारांना “मला मत द्या’ असं म्हणताना या नेत्यांना कुणी विचारलं की तुमचं मत कुणाला देणार, तर त्यांच्या तोंडून साहजिकच दुसऱ्या उमेदवाराचंच नाव येईल. 2019 च्या या निवडणूक संग्रामात असे कोणकोणते नेते आहेत पाहूया.

नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या यादीतील सर्वांत मोठे आणि पहिले नाव आहे. गेल्या वेळी मोदींनी वाराणसी आणि बडोद्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यंदा ते केवळ वाराणसीतूनच रिंगणात आहेत. मात्र, या मतदारसंघात त्यांचे मतदान नाहीये. ते गुजरातमधील अहमदाबाद मतदारसंघातील मतदार आहेत. गुजरातेत डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोदींनी अहमदाबादला जाऊन मतदानाचा हक्‍क बजावला होता.

सोनिया गांधी : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आजवर अनेकदा रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे. रायबरेलीतील जनतेने त्यांना प्रत्येक वेळी लाखांहून अधिक मताधिक्‍याने विजयी केले आहे. पण या भरभरक्‍कम मताधिक्‍यामध्ये सोनियांचे स्वतःचेच मत नसते. कारण सोनिया गांधी या रायबरेलीच्या मतदार नसून दिल्लीतील मतदार आहेत.

राहुल गांधी : 2004 पासून अमेठीतून लोकसभा निवडणूक जिंकत आलेल्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यंदा पुन्हा एकदा अमेठीमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. अमेठीबरोबरच राहुलबाबा केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातूनही रिंगणात उतरले आहेत. गंमत म्हणजे राहुल गांधी दोन्हीही ठिकाणी स्वतःसाठी मतदान करू शकणार नाहीत. कारण त्यांचे स्वतःचे मतदान दिल्लीमध्ये आहे.

अखिलेश यादव : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव 2009 नंतर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका लढवत आहेत. त्यांनी आजममढ लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या जागेवर गतवेळी त्यांचे पिता मुलायमसिंह यादव निवडून गेले होते. यंदा ते स्वतः रिंगणात असूनही त्यांना स्वतःला स्वतःसाठीच मतदान करता येणार नाहीये. कारण अखिलेश सैफई मतदारसंघातील मतदार आहेत.

रिटा बहुगुणा : अलाहबादमधील भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनाही आपल्या मताचा वापर स्वतःसाठी करता येणार नाही. कारण रिटा या अलाहबादमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या असल्या तरी त्या लखनऊमधील केंट विधानसभा मतदारसंघातील मतदार आहेत.

हेमामालिनी : बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी यंदा भाजपातर्फे मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हेमामालिनींना मथुरेतील जनतेने भलेही लाखोच्या संख्येने निवडून दिले असले तरी त्या स्वतः या मतदारसंघातील मतदार नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही या लोकसभा मतदारसंघातील मतदार नाहीत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)