आपलं आयुष्य नंदनवन!

असं वाटतं का सख्यांनो कधी की खड्डयात गेली सगळी कामं, मस्तपैकी ताणून देऊया, किंवा गाणी ऐकत बसुया, किंवा बघत बसूया, एखाद्या वेबसिरीजचे सगळे भाग एका दमात? नक्‍कीच वाटत असेल. अहो रोजरोज तेचतेच करून येतोच की कंटाळा! माणूस आहोत शेवटी, मशीन नाही ना? नोकरी करणारी स्त्री असो वा संपूर्ण वेळ गृहिणी, घरातील कामे संपतच नाहीत. तरीही हल्लीची स्त्री स्वतःसाठी वेळ मिळावा, आणि जरा मुबलक पैसा हाती असला तर घरकाम आणि वरकाम करण्यासाठी एखादी बाई ठेवतातच। पण कसं आहे, सगळीच कामे नाही ना करू शकत त्या? अनेक बारीकसारीक कामं असतात हो घरात! अगदी सकाळी उठून दुधावरची साय काढण्यापासून ते रात्री झोपताना विरजण लावणे, किंवा काहीतरी भिजत टाकणे इथपर्यंत. परत उद्याच्या भाजीचा, नाश्‍त्याचा विचार चालू असतोच एका बाजूला डोक्‍यात.

तर हे सगळं सांगायचं अशासाठी की, ही कामे करायला ऊर्जा, किंवा आवड जी लागते ती संसार जसजसा परिपक्‍व होत जातो थोड्याफार प्रमाणात कमी होत जाते. एकतर आपलं वय, स्टॅमिना, तेचतेच काम करून येणारा कंटाळा हे कारणीभूत असते या सगळ्याला. आपण रात्री झोपतो, सकाळी फ्रेश होऊन परत त्याच कामांमध्ये गुंततो. कधी कधी कंटाळा येतो ऑफिसला जायचा, तरीही ओढून ताणून सगळी कामे उरकून जातोच, काय करणार आपण गुलाम असतो शेवटी नोकरीत. व्यवसाय असला तरीही वेगळं असं काही नसतंच.

रात्रीच्या झोपेने, किंवा आराम करण्याने शारीरिक थकवा दूर होतो, पण मन? त्याला आलेला थकवा? याचा कधीच आपण विचार करत नाही! कधी विचार केलात तर कामे उरकायला लागणारा वेळ खरंतर कमी असतो, पण उगाचच असं वाटतं काही क्षणाला कि सगळं आयुष्य ह्यातच जाणार आहे का आपलं? मग ह्या मनाचा थकवा कसा दूर कराल? कारण थकलेल्या शरीरापेक्षा थकलेलं मन खूप त्रासदायक असतं! हल्ली खूप सख्या किचनमध्ये विरंगुळा म्हणून एका बाजूला गाणी ऐकत ऐकत कामे हातावेगळी करतात. अशाने काय होते की, कामेसुद्धा होतात आणि आपण त्या गाण्यात हरवून आपला मूडही उत्तम राहतो. अगदी खूप खूप थकल्यासारखे वाटले तर पाच एक मिनिटं शांत बसून, परत कामाला सुरवात केली तरीही फ्रेश वाटते. ह्यात जर घरच्यांनी किंवा नवऱ्याने मदत केली तर काय सोन्याहून पिवळे.

विक-एंडला मुव्ही, नाटक एखादी शॉर्ट ट्रिप यातूनही मनाला नवीन कामासाठी ऊर्जा मिळते. कधीतरी पुस्तकं वाचून किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम अटेंड करूनसुद्धा वेगळीच ऊर्जा मिळते. संगीत हीसुद्धा एक थेरपीच आहे.
हल्ली मोबाइलमुळे माणसांमधला संवाद कमी झाला आहे, असं म्हणतात. अशावेळी सगळ्या कुटुंबाने मारलेल्या एकत्र गप्पा, किंवा एखादा खेळ खेळणंसुद्धा तुम्हाला ताजतवानं करू शकतं.

आपल्या एखाद्या आवडत्या मित्र-मैत्रिणीशी बोलल्यानेसुद्धा उत्साह मिळू शकतो. आपल्या मनाला ताजतवानं करण्यासाठी हे सगळे उपाय आपल्याच हातात असतात, फक्‍त आपण ते शोधत नाही. पुलं म्हणतात नोकरी ही उपजीविकेसाठी असते, पण एखादा छंद हा जगण्यासाठी असतो, तर एखादा छंद जोपासा, आपल्या आतील कलाकाराला साद घाला.
वाटलं एखाद दिवस मारूया दांडी ऑफिसला, तर मारा ना! काहीही आकाश कोसळणार नाहीये पण नेहमी नाही बरं का! कारण काय आहे जीवन आपलं आहे, आपणच ते सजवायचे, फुलवायचे आहे, सतत नकारात्मक विचार करून, थकेलेलं मन तसंच पुढे पुढे रेटत घालवलेलं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे, नाही का?

सख्यांनो माणसाचे आयुष्य एकदाच मिळतं, त्यात स्त्रीचा जन्म कितीही आधुनिकतेचा स्वीकार केलात तरीही “रांधा-वाढा-उष्टी काढा’ हे सत्य स्वीकारतच असणारा तर आपणच सुंदर करूया ना आपलं जीवन! निसर्ग, वाचन, छान नाती हे सगळं उपभोगत, आनंदी क्षण साठवत एक नंदनवन फुलवायला आजच करूया सुरुवात…
-मानसी चापेकर

Leave A Reply

Your email address will not be published.