जीवनगाणे: तुझा देव तुझ्या आत…

अरुण गोखले

ईश्‍वराचा शोध हे मानवी जीवनाचे खरं साध्य आहे. पण होते काय, की तो तसा ईश्‍वराचा शोध घ्यावा असे कुणाला वाटत नाही. ज्यांना वाटते ते योग्य मार्गांनी शोध घेत नाहीत. कारण तो कसा आहे? कुठे आहे? त्याचा शोध कोणत्या मार्गांनी घ्यायचा, हेच आम्हाला कळत नाही. संत सद्‌गुरू हे नेमके तेच समजावून सांगतात. हाच बोध देतात की तेल जसे तीळात असते. ज्याप्रमाणे तेज/प्रकाश हा अग्निमध्ये सामावलेला असतो. त्याप्रमाणेच हे माणसा! अरे तू ज्याला बाहेर शोधतो आहेस ना? तो तुझा देव तुझ्याच आत आहे.

ही देवाची आतली जागा नेमकी कोणती? हे साधू संत सत्‌पुरूष आणि सद्‌गुरू ह्यांनाच ठाऊक असते. माणूस देव दगडामातीच्या मूर्तीत, मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात शोधत असतो. जन्माबरोबर नाळ कापताच जीवास स्वत:च्या अहं ब्रह्मास्मि ह्या अवस्थेचा विसर पडतो. मी ईश्‍वराचा अंश आहे. तो मीच आहे हे जीव विसरतो. “स्व’च्या “मी’च्या गुंत्यात तो दिवसेंदिवस गुंतत जातो. तिकडे त्याचा विसर पडतो आणि इकडे जीवाचा मी हा वाढत जातो.

जीवनातले यशापयश, सुखदु:ख, लाभहानि माणूस “मी’शीच जोडत जातो. त्याला चालविणाऱ्या, बोलविणाऱ्या, खेळवणाऱ्या ईश्‍वरी आत्मशक्‍तीचा त्याला सोईस्करपणे विसर पडतो. देवाचं देणं हे तो आपलं कर्तृत्व म्हणून मिरवायला लागतो. त्याला त्याच्याच अंतरंगात असलेली आत्मसत्ता कळत नाही. ती श्‍वासाची बासरी वाजविणारा बन्सीधर कळत नाही. संत, सद्‌गुरू म्हणतात की “बाबारे त्याचा शोध हा डोळे उघडून नाही, तर जगाकडे पाठ फिरवून, एकांतात बसून आणि डोळे मिटून आपणच आपल्या आत घ्यायचा असतो. ही देव शोधायची प्रक्रिया जरी उलटी असली तरी तो कळण्यासाठी आपल्याला आपलं मन आणि वृत्ती ह्या आतच वळवायला लागतात.

प्रत्येकाच्या हृदयात विराजमान असलेला तो आत्माराम हा आपण द्रष्टेपणानी पाहायला हवा आणि त्याचा शोध घ्यायला हवा. तो तसा प्रयत्नपूर्वक शोध घेणे ह्यालाच आत्मज्ञानाची अनुभूती, आत्मशोध असे म्हणतात. हे माणसा! तो तुझ्यातल्या देव तूच शोधून घे. कारण तो इतर कोठे नाही तर तो तुझ्याजवळ आणि तुझ्याच हृदयात आहे. त्याचा शोध हीच तुझी तुला होणारी तुझी खरी ओळख आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)