चंडीगढ – पंजाबमधील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार अमनदीप आशू बांगड यांनी सोमवारी अचानकपणे पक्षबदल करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणूक काळातील ही घडामोड आपसाठी राजकीय हादरा ठरली आहे.
फिरोजपूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आपने काही दिवसांपूर्वी बांगड यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्या पक्षाला धक्का देत बांगड यांनी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बांगड यांनी आपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीप्रमाणे आपचे कामकाज चालते. निर्णयाचे अधिकार केवळ दिल्लीतील नेत्यांनाच आहेत. पंजाबमधील नेत्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान नाही. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसा खर्च करण्याचा आदेश आपच्या नेतृत्वाने दिला.
पंजाबमधील नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही. आप नेतृत्वाला केवळ होयबा हवे आहेत, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी केली. तर, पंजाबमध्ये आपचा फुगा फुटू लागल्याचा दावा चन्नी यांनी केला. बांगड यांना त्याच जागेवरून कॉंग्रेसची उमेदवारीही त्यांनी जाहीर केली. पंजाब निवडणुकीत कॉंग्रेस आणि आपमध्ये प्रमुख लढत अपेक्षित आहे.