“तुमच्या बँका आम्हाला पीककर्ज द्यायला तयार नाहीत, मग तुम्ही नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या”

तरुण शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी ;पत्राद्वारे मांडली कैफियत

मुंबई : देशात एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील इ शेतकऱ्याने देखील आपली कैफियत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. मात्र ही कैफियत मांडत असताना त्याने आपल्याला नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या अशी धक्कादायक मागणी देखील केली आहे.

हिंगोलीमधील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे रहिवाशी असणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याने हे पत्र लिहिले आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये पतंगे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पतंगे यांनी एक शेतकरी म्हणून आपली व्यथा मांडली आहे. माझे वडील, माझे आजोबाही शेतीच करायचे. मग आमचा वडिलोपार्जित व्यवसाय जर शेती असेल तर आम्हाला एक वर्षीचा दुष्काळ का सहन होऊ नये? मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या. तुम्ही कर्जमाफी दिलीत पण ती आमच्यापर्यंत पोचलीच नाही, तुम्ही योजना आणली पिकेल ते विकेल पण आमच्याकडे पिकलंच नाही तर विकावं काय?, असा प्रश्न या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचप्रमाणे पत्रामध्ये मांडण्यात आलेली कैफियत केवळ माझीच नसुन माझ्यासारख्या हजारो तरुणांची असल्याचे पतंगे यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

तुम्ही पिकलं नाही म्हणुन अनुदान दिलंय. पण नुकसान एक हेक्टर आणि मदत नऊ हजार. तुमचे लाईनमन दादागिरी करायला लागेलत, न सांगताच लाईन कापत आहेत. तुमच्या बँका अजुनही शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या, असं या पत्रात पतंगे यांनी म्हटलं आहे. निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. तुम्ही सांगितलेलं की पाच एकरासाठी २० हजार रुपये देऊत पण प्रशासनाने आमच्या हाती नऊ, पाच हजार देऊन आमची बोळवण केली. महावितरणचे अधिकारी वीज कापण्यासाठी येत आहेत. आता गुरांना पाणी देण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. प्रशासनाने अशी भयान परिस्थिती करुन ठेवली आहे की आता नक्षवादी होण्याशिवाय काहीही पर्याय उरलेला नाही, असे पतंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी त्यांनी स्वत:ची ओळख ‘तुमच्या महाराष्ट्रातील एक अभागी शेतकरी’ अशी करुन दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.