जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर : आगामी काळात युवकांना विविध जबाबदाऱ्या देणार
न्हावरे – राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळातला आक्रमक आणि जिद्दीने केलेला प्रचार युवकांना भावला. त्यामुळेच राज्यातील व विशेषतः पुणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तरुण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यामागे उभा राहिला, अशी प्रतिक्रिया पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.
विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या भेटीदरम्यान गारटकर शिरूरचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार ऍड. अशोक पवार यांची भेट घेण्यासाठी वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला.
गारटकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये युवकांना चांगले भवितव्य असून आगामी काळात पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या युवकांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नव्या, जुन्यांचा योग्य पद्धतीने मेळ घातला जाणार आहे. तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गद्दार हद्दपार मोहीम त्या – त्या तालुक्यातील आमदारांशी किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच अंमलात आणली जाणार आहे, असे गारटकर यांनी सूचक वक्तव्य केले.
पुढील सर्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जिल्ह्यात संपूर्ण ताकदीने फक्त जिंकण्यासाठीच लढवणार आहे. त्यामुळे निवडून येण्याचा निकष आणि सर्वसमावेशक उमेदवार ही अट पक्षाकडून असणार आहे. त्याचप्रमाणे पक्ष संघटना मजबुतीकरणासाठी महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्यांचाही पक्षात आदर केला जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व मतदारांचे गारटकर यांनी आभार मानले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहे.
गारटकर म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये शरद पवार यांचा विचार रूजलेला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांनी शरद पवार यांच्या हाकेला साथ दिली. त्यामुळेच राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळाले.