तरुण, राजकारण आणि हरवत चाललेली मतं..!

हो, जे वाचलंत वर तेच आज जागोजागी पाहायला, ऐकायला मिळतय. निमित्त आहे ते आगामी लोकसभा निवडणुकांचं. या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा तरुण, आजचा युवा स्वतःचं मत हरवून बसला आहे असं वाटतं. का ते माहीत नाही पण अस वाटतं की कोणीतरी कोणाचातरी विरोध करत बसलाय, तर कोणीतरी कोणाचतरी समर्थन करत बसलय आणि विशेष म्हणजे हे समर्थन किंवा विरोध हे आता टोकाचे होऊ लागलेत.

आपल्याला लोकशाहीने कोणाचाही विरोध किंवा समर्थन करण्याचा अधिकार दिला आहे. पण ते समर्थन असो किंवा विरोध ह्या दोन्ही गोष्टी प्रमाणात असाव्यात हे आजचा युवा विसरून गेलाय अस वाटतं. त्यामुळे नक्कीच युवकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो अन्‌ या निवडणुकीच्या काळात तर दोन्ही बाजूने बोलणारे लोक आजूबाजूला खूप आत्मविश्‍वासाने त्यांचं मत मांडत असतात मग त्यांच्या मताचा नाही म्हंटलं तरी थोडा परीणाम होतोच अन आधीच गोंधळून गेलेला युवक अजून गोंधळून जातो अन ‘वैताग आलाय या राजकारणाचा’, ‘साला काही कळतच नाही कोण चांगलं कोण वाईट’, ‘सगळे एकाच माळेचे मणी’ अस म्हणून या विषयाकडे अभ्यासपूर्ण भूमिकेतून बघण्याऐवजी दुर्लक्ष करतात. आता उदाहरण द्यायचे झाले तर समजा मला मोदी पंतप्रधान म्हणून आवडतात, योग्य वाटतात (आणि खरच ‘सध्यातरी’ मला मोदीच योग्य वाटतात हे स्पष्ट मत माझं आजही आहे) तर म्हणून मी काय मोदींचं आंधळं समर्थन करायचं?

आत्ता परवाच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने छत्तीसगड येथील काही हेक्‍टर जंगलाच्या ठिकाणी खाणीसाठी परवानगी दिली. आता मला कितीही मोदी हवे असले पंतप्रधान पदी म्हणून काय मग मी ह्यांच्या या निर्णयाला समर्थन करायचं? कानाडोळा करायचा? अजिबात नाही. त्यांनी काही योग्य केलं तर योग्य म्हटलच पाहिजे अन त्यांनी काही चूक केली तर ठामपणे विरोध करताच आला पाहिजे. हा नियम माझ्या आवडत्या मोदींना जसा लागू होतो तसाच गांधी, पवार, ठाकरे ई. सर्वांना लागू होतो. मला तर ही अशी भूमिका योग्य वाटते. कोणी काही चांगलं केलं तर चांगलं म्हणावं मग तो कोणत्याही पक्षाचा असो अन काही अयोग्य केलं तर ठामपणे विरोध करावा घाबरायचं कशाला अन कोणाला?

शिवछत्रपतींना आदर्श मानणारे युवक तुम्ही आम्ही घाबरावे कोणाला अन कशासाठी? त्यामुळं कोणाच्याही बोलण्यावरून आपलं मत तयार करून आंधळेपणाने ते व्यक्त करण्यापेक्षा थोडा आपल्या मनाशी संवाद साधावा. योग्य काय अन अयोग्य काय याची ओळख आपलं मन आपल्याला नेहमी करून देत असतं. अशी जागरूक, ठाम व स्पष्ट भूमिका प्रत्येक युवकाने ठेवली तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. अशी जागरूकता,स्पष्ट भूमिका ठेवली तर कोणताही गोंधळ होणार नाही आणि तरच तुम्हाला कदाचित स्वामी विवेकानंदांच्या नजरेतील 100 युवकांमध्ये स्थान मिळू शकते. महाराजांची कौतुकाची थाप पाठीवर पडू शकते. पण हे सगळं घडत नाही, आपण एवढया स्पष्टपणे, जागरूकपणे आपलं मत तयार करून मांडू शकत नाही कारण आपण विचार सोडून व्यक्तीला बांधील होतो, कारण आपण विचारांऐवजी कोण्याएका व्यक्तीमुळे प्रभावित होतो. आपण सत्याला सोडून द्वेष, मत्सर अन तिरस्काराला बांधील होऊन बसतो. कशासाठी? या देशाचे मालक हे विधिमंडळात बसणारे लोक नसून “आपण भारताचे लोक’ आहोत हे समजून घ्यायला हवं.

शेवटी हा गोंधळ नाहीसा करून जर बलसागर भारत घडवायचा असेल तर या युवकांसाठी अन सर्वांसाठी एकच ओळ लिहून लेखनसीमा गाठावी वाटते ती म्हणजे “उत्तम ते वेचावे’

– शिवम प्रमोद कांबळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.