नंदुरबार – आजोबाच्या दशक्रिया विधीला मुंडन केल्यानंतर तापी नदीत आंघोळीसाठी गेल्यावर पाय घसरल्याने मोठा भाऊ वाहुन जात असताना त्याला वाचवताना लहान भाऊ वाहुन गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे घडली आहे.
येथील तापी नदीच्या पात्रात हा प्रकार घडला असून मच्छिमारांनी उडी टाकत मोठ्या भावास वाचविले आहे. गौतम सामुद्रे असे मोठ्या भावाचे नाव असून त्यास उपचारासाठी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तसेच लहान भाऊ राज सामुद्रे याचा पाण्यात शोध घेणे चालू आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, रविन सामुद्रे यांचे वडील मयत झाले होते. वडीलांच्या दशक्रिया विधीसाठी काल नातेवाईकांसमवेत रविन सामुद्रे केदारेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या स्मशानभूमीजवळ तापी नदीकिनारी गेले होते.
यावेळी रविन सामुद्रे यांचा मोठा मुलगा गौतम सामुद्रे व लहान मुलगा राज सामुद्रे हे दोघेही मुंडन केल्यानंतर आंघोळीसाठी तापीनदी किनारी पाण्यात आंघोळीसाठी उतरले. यावेळी गौतम सामुद्रे याचा अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या सोबत असलेला लहान भाऊ राज सामुद्रेने गौतमला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने राज सामुद्रे वाहुन गेला.