पिंपरी – बारा वर्षीय भावाने आपल्या तीन वर्षीय लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे यूट्युबवर पाहून हे कृत्य केल्याचे त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितले. ही धक्कादायक घटना भोसरी येथे घडली.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2021 मध्ये पिडित मुलीचे आई-वडिल दोन्ही मुलांना घरी ठेवून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी बारा वर्षीय मुलाने वडिलांच्या मोबाइल यूट्युबवर पाहिलेल्या चित्रफितीप्रमाणे आपल्याच बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र याबाबत घरच्यांना काहीच कल्पना नव्हती.
गुरुवारी या मुलीला त्रास झाल्याने तिला वायसीएम रुग्णालयात नेले. तिथे तपासणी केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी मुलीला विश्वास घेत विचारणा केली असता दादाने हे कृत्य केल्याचे सांगितले. त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता त्यानेही केलेल्या कृत्याची कबुली दिली.
ही बाब पोलिसांना कळली. मात्र मुलगाही आमचाच आणि मुलगीही आमचीच असल्याने काय करणार, असे म्हणत आई वडिलांनी फिर्याद देण्यास नकार दिला. मात्र पोलिसांनी त्यांचे प्रबोधन केल्यावर अखेर मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली.