युवा कुस्तीपटू सागर धनखार हत्या प्रकरण: मुख्य आरोपी कुस्तीपटू सुशील कुमार अखेर पोलिसांना शरण येणार

नवी दिल्ली, दि. 18 – युवा कुस्तीपटू सागर धनखार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दोन ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार अखेर पोलिसांना शरण येणार असल्याचे संकेत आहेत. आपल्याला या गुन्ह्यात विनाकारण गोवण्यात आल्याचे त्याने पोलिसांशी संपर्क करून सांगितल्याची माहितीही दिल्ली पोलिसांनी दिली असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आल्यानेच त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

सुशील कुमार दिल्ली-एनसीआरच्या न्यायालयात उद्या (बुधवारी) शरण येऊ शकतो. त्यानिमित्ताने मॉडेल टाऊन पोलीस स्टेशनच्या पोलिसांना व्हॉट्‌सऍपवरून ही माहिती देण्यात आली आहे.

सुशील आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेसाठी सतत छापे टाकले जात आहेत. इतकेच नाही तर दबाव निर्माण करण्यासाठी सासरे, पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांचीही सतत विचारपूस केली जात आहे. दरम्यान, सुशील कुमारने आपल्या वकिलामार्फत दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला असल्याने त्याला शरण येण्याव्यतिरिक्‍त अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही.

नातेवाईक आणि तज्ज्ञांच्या चौकशीदरम्यान सुशीलने आता कोर्टात शरण जाण्याची तयारी केली आहे. सुशील कुमारने मॉडेल टाऊन पोलिसांशी संपर्क केला व शरण येणार असल्याचे सांगितले आहे.

तपासणीदरम्यान सुशील कुमार त्याच्या अन्य साथीदारांसह विविध ठिकाणी लपलेला होता. या भागातील एका फार्महाऊसवरूनच त्याने पोलिसांशी संपर्क साधल्याचेही सांगितले जात आहे. त्याला येथे घेऊन जाण्यात त्याचा मित्र असलेल्या अजय कुमार याने मुख्य भूमिका निभावल्याचे संकेत मिळत असून अजयचे वडील दिल्ली महानगरपालिकेत एका बड्या राजकीय पक्षाचे नगरसेवक आहेत.

एक लाखाचे बक्षीस लावले होते
खुनाच्या या घटनेप्रकरणी सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिल्ली पोलिसांनी जाहीर केले होते. ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागरची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. या प्रकरणात सुशील कुमार हाच मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात होते.

यानंतर सुशील कुमार फरार झाला होता. सुशीलचा मित्र असलेला अजय कुमार यालाही फरार घोषित करण्यात आले असून त्याची माहिती देणाऱ्यालाही 50 हजारांचे बक्षस देण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.