- विशाखापट्टणम येथील तरुणीस पुण्यात अटक
- पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटविरुद्धही गुन्हा
पुणे – बनावट कागदपत्रांद्वारे आधारकार्ड तयार करून त्याआधारे पासपोर्ट मिळवून नोकरीसाठी दुबईला जाऊन आलेल्या आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम येथील 22 वर्षीय महिलेला विमानतळ पोलिसांनी अटक केली. दम्मू सितारत्नम असे तिचे नाव आहे. न्यायालयाने तिला 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर, एजंट सूर्या (रा. विशाखापट्टणम्) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.3 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार उघडकीस आला. दम्मू हिने दासरी स्वप्ना या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले. आधारकार्ड तसेच बनावट कागदपत्रे सादर करत तिने पासपोर्ट मिळविला. त्याआधारे तिने नोकरीसाठी दुबईचा व्हिसा मिळवला.
त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथून दुबईला गेली. तर, 3 डिसेंबर रोजी पुणे येथे परतली असता, लोहगाव विमानतळ येथे तिला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. कोंघे म्हणाले, “गुन्ह्यातील जप्त आधारकार्ड एजंट सूर्या याने दिल्याचे आरोपी सांगत आहे. बनावट पासपोर्ट तसेच आधारकार्ड तयार करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास करायचा आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी विशाखापट्टणम येथे जाऊन मुख्य आरोपीचा शोध घ्यायचा असल्याने तिला पोलीस देण्यात यावी.’