पिंपरी – मंदिरात लग्न केलेले असतानाही तरुणाने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. हा धक्का सहन न झाल्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण पांडुरंग पवार (रा. शळद, ता. बाळापूर, जि. अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी किरण पवार याने फिर्यादीच्या मुलीसोबत मंदिरात लग्न देखील केले. लग्न झालेले असताना आरोपीने स्वतःचे दुसरे लग्न ठरवले. दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्नाला नकार दिला. प्रेमात झालेली फसवणूक सहन न झाल्याने फिर्यादीच्या मुलीने 9 जून रोजी बोऱ्हाडेवाडी मोशी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.