मुंबई – वर्ष 2011 मध्ये त्याने एका महिलेबरोबर अश्लील वर्तन केले होते. त्यावेळी त्या महिलेच्या तक्रारीवरुन त्याला अटकही झाली होती. तथापि या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने किमान 50 महिलांसोबत तसेच अश्लील कृत्य केल्याचे दिसून आले. त्याच्या वागण्यात कसलाही फरक न पडल्याने तो अधिकच धाडसी बनत चालला होता.
अशातच 12 डिसेंबर रोजी दिंडोशी पोलिस ठाण्यांतर्गत 24 वर्षीय महिलेचा विनयभंग झाला. पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एका व्हिडिओत सदर आरोपी महिलेबरोबर अश्लील कृत्य करताना दिसून आला. या व्हिडिओवरून पोलिसांना आरोपीचा दुचाकी क्रमांक सापडला आणि त्याची ओळख पटली. परंतु, वारंवार घर बदलल्यामुळे पोलिस त्याच्यापर्यंत सहज पोहोचू शकत नव्हते. परंतु इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्सच्या मदतीने मंगळवारी त्याला IPC च्या 354 (महिलेचा विनयभंग) आणि धमकी देण्याच्या (506) आरोपाखाली अटक करण्यात आली.
अटक केलेल्या 30 वर्षीय व्यक्तीचे नाव कल्पेश देवधर असे आहे. व्यवसायाने चालक असलेला कल्पेश महिलांची छेडछाड करण्यासाठी स्पोर्टस बाइक वापरत असे. तो एकट्या जाणाऱ्या महिला, मुलींसमोर आपली दुचाकी उभी करून आधी बोलायचा त्यानंतर त्यांच्याशी अश्लील कृत्य करून फरार व्हायचा. बऱ्याच वेळा तो मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत जायचा आणि अश्लील हावभाव करत असे. कल्पेशविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 40 हून अधिक गुन्हे दाखल असून त्याला 12 पेक्षा जास्त वेळा अटक करण्यात आली होती.
आरोपींच्या अटकेनंतर पवई परिसरातील एका महिलेचा शोध लागला. वर्ष 2017 मध्ये कल्पेशने तिचा विनयभंग केला होता. तसेच तो नुकताच डीएन नगर पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. कल्पेश देवधर काही वर्षांपूर्वीपर्यंत आपली आई आणि 3 भावांबरोबर मलाड वेस्टमध्ये राहत होता. पण त्याच्या या वागण्यामुळे कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर काढले होते. त्याच्यामधल्या या विकृतीला संपवण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे.