युवकांचे आशास्थान : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. हिंदूराव नाईक-निंबाळकर आणि श्रीराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ. मंदाकिनी यांचे द्वितीय सुपुत्र रणजितसिंह यांनी अल्पावधीत उद्योग व्यवसायाबरोबर राजकारणातही केलेल्या उज्वल कामगिरीमुळे त्यांच्याकडे जिल्हा मोठ्या अपेक्षेने पहातो आहे. रणजितदादा लहान वयातच राजकारण आणि समाजकारणात सक्रिय झाले. कोरडवाहू भागातील शेतकरी तरुणांना उद्योग निर्माण करुन दिल्याखेरीज त्यांची स्थिती सुधारणार नाही हे ओळखून त्यांनी स्वराज इंडिया ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. संस्थेची स्थापना करुन त्यामाध्यमातून पहिल्या टप्प्यात स्वराज दूध प्रकल्पाची उभारणी केली.

प्रकल्पामध्ये अत्याधुनिक मशिनरीसह सर्व साधने सुविधा उपलब्ध करुन संगणकीकृत केला आहे. दररोज सुमारे 5 लाख लिटर दूध संकलन करणाऱ्या या प्रकल्पाद्वारे दूध पावडर आणि अन्य दूग्धजन्य पदार्थांची निर्मिती त्याचबरोबर अर्धा व एक लिटरच्या पॉलिथिन बॅगमधून दूध विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येते. मुंबई, पुणे, वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर यासह राज्याच्या विविध भागासह गोवा आणि कर्नाटकातही स्वराजच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असून त्यासाठी मुंबई व पुणे येथे वितरण केंद्रे उभारुन सर्व व्यवस्था पाहिली जाते. प्रकल्पाद्वारे 36 तालुक्‍यातून दूध संकलन करण्यासाठी रणजितदादा मोटार मालक सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेच्या वाहनाबरोबरच सुशिक्षीत बेरोजगारांना बॅंकांच्या अर्थसहाय्यातून वाहने खरेदी करुन ती या संस्थेमार्फत दूध संकलनासाठी सामावून घेवून तरुणांना व्यवसायाच्या संधी देण्याबरोबरच या संपूर्ण प्रकल्पात तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील सुमारे 700 ते 800 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यातही रणजितदादा यशस्वी झाले आहेत.

त्याचप्रमाणे स्वराज पतसंस्थेची उभारणी करुन ती योग्य प्रकारे अर्थसहाय्य आणि सक्षम वसूलीद्वारे अधिक मजबुतीने कार्यरत आहे. दूध प्रकल्प, मोटार वाहतूक संस्था आणि पतसंस्थेच्या उभारणीनंतर रणजितदादांनी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्वराज इंडिया ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. च्या माध्यमातून लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याची व अर्कशाळा आणि वीज निर्मिती प्रकल्प असा सुमारे 350 कोटी खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला. यावर्षीचा तिसरा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरु करुन उस उत्पादक, तोडणी वाहतूक ठेकेदार कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. मराठा समाज संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले माध्यमिक विद्यालय गतीमान करुन दर्जेदार शिक्षणासाठी ते सक्षम करीत आहेत.

सर्वसामान्यांविषयी तळमळ, पिताश्री हिंदूराव यांचे मार्गदर्शन आणि बंधू समशेरसिंह, पत्नी जि. प. सदस्या ऍड. सौ. जिजामाला यांच्यासह सहकारी कार्यकर्त्यांची सक्रिय साथ आणि तत्कालीन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांचा आशिर्वाद लाभल्याने त्यांचा प्रवास सातत्याने प्रगतीच्या दिशेने वेगवान आहे. आता राष्ट्रीय कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली असल्याने संपूर्ण जिल्ह्यात संपर्क वाढवून कॉंग्रेसचा बालेकिल्ला आणि त्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची गुरुकिल्ली सांभाळणारा जिल्हाध्यक्ष, सर्व घटकांना न्याय देण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि ज्येष्ठांचे आशिर्वाद व मार्गदर्शन, तरुणांची साथ लाभावी, हीच वाढदिवसाच्या निमित्ताने परमेश्‍वर चरणी मागणी.

– डॉ. सुभाष गुळवे, फलटण

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×