पुणे – विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या संशोधनामुळे विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी निर्माण होत आहे. त्यामुळे तरुणांनी उद्योजकता विकसित करण्यासाठी इनोव्हेशन व इन्क्यबुशनवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. असे केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क, पुणे आणि एस. एम. ई. चेंबर ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या डीएसटी प्रयास शाळा, रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन व हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण शरद पवार यांचे हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कचे अध्यक्ष दिलीप बंड, उद्योजक प्रतापराव पवार, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, एस एम ई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, संस्थेचे संयुक्त चिटणीस ऍड. संदीप कदम व ऍड. भगवानराव साळुंखे, खजिनदार विजयसिंह जेधे, कमल व्यवहारे, अजय पाटील, नियामक मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, नवे विचार, कल्पना संशोधनातून पुढे येत आहेत. त्यामुळे तरुणांनी स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे रहाण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदान घ्यावा असे आवाहन त्यांनी केली. तरुणांना विज्ञानाचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. राज्याच्या व देशाच्या औद्योगिक विकासामध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी संस्थांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहायाने स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रमिला गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. दिपक गायकवाड व डॉ. गायत्री कांबळे यांनी केले. प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांनी आभार मानले.