भोर तालुक्‍यात तरुणाईचे लग्नच जमेना!

– दत्तात्रय बांदल

भाटघर – भाटघर परिसरात एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला धरण अशी भौगोलिक परिस्थिती आहे. यामुळे या भागातील बरेच तरुण अल्पभूधारक आहेत. या सर्व गोष्टींमुळे येथील तरुणाईचे उत्पन्न कमी आहे. यामुळे भोर तालुक्‍यातील वधू पक्षाच्या मागणीस वर पक्ष असमर्थ ठरत आहेत. याचा परिणाम लग्न जुळण्यास होत असून मुलांचे वय लग्नाच्या वयाच्या पलीकडे होत चालले आहे. मुलींच्या संख्येत घट झाल्याने याचा परिणाम सद्यस्थितीत लग्न जुळवताना दिसून येत आहे.

पूर्वीच्या काळी लग्न जुळवताना वरपक्षांकडून रोख रक्कम व दागिन्यांच्या स्वरूपात हुंड्याची मागणी होत असे. अपेक्षित हुंडा न दिल्यास वरपक्षाकडून स्थळे नाकारली जात होती, परंतु अलीकडच्या काळात उलट परिस्थिती निर्माण झाली असून वधू पक्षांकडूनच स्थळे नाकारली जात आहेत. मुलांचे वय वाढत चालले असून लग्नायोग्य वयाच्या पलीकडे होत चाललेले दिसून येत आहे. तालुक्‍यात बरेच तरुण लग्नापासून वंचित राहिल्याचे दिसत आहेत. मुलांच्या तुलनेत सरासरीपेक्षा मुलींचे प्रमाण खूपच कमी आहे. वीस ते पंचवीस वर्षीपूर्वी गरोदरपणी सोनोग्राफी मार्फत मुलगा आहे की मुलगी आहे याची तपासणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. मुलगी असल्यास गर्भपात केला जात असे. याचा परिणाम आता दिसू लागला आहे. मुलींचे प्रमाण खूपच कमी झाल्याने बरेच तरुण लग्नापासून वंचित राहत आहेत.

पूर्वीच्या काळी लग्न जुळविताना वर पक्षाकडून रोख रक्कम व दागिन्यांच्या स्वरूपात हुंडा घेतला जाई. लग्न कार्यालय, वऱ्हाडी मंडळींना जेवणाची सोय, वाजंत्री हा सर्व खर्च वधूपक्ष करीत होता. या सर्व सुविधा पुरविण्याचे ठरले तरी मुलगी सुंदर नसेल तर वरपक्षाकडून स्थळ नाकारले जात होते, परंतु अलीकडच्या काळात उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलाकडे फ्लॅट आहे की नाही?, मुलाची नोकरी कायमस्वरूपी आहे की नाही?, त्याला पगार चांगला आहे की नाही? अशा विविध मागण्या वधू पित्याकडून केल्या जात आहेत. पूर्वीचा काळ व आताचा काळ यात मोठा बदल झालेला दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार जीवनशैलीमध्येही बदल होत आहे. नागरिकांच्या विचार करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. लग्न जुळवताना नातेवाईकांची फार मोठी भूमिका असते. जास्त करून ओळखीवरच स्थळे येत असतात, परंतु आजच्या स्थितीत तालुक्‍यात तरुणांचे उत्पन्न कमी असल्याने एरवी आपुलकीचे वाटणारे नातेवाईकही स्थळे आणण्यास टाळाटाळ करीत आहेत.

शेतकरी मुलास मुलींचा नकार
शेतकरी मुलापेक्षा नोकरदार मुलास अधिक पसंती दिली जात आहे, परंतु भोर परिसरात बेरोजगारीचे प्रमाण जास्त असल्याने बराच तरुणवर्ग या मागण्या पूर्ण करू शकत नाही. भोर परिसरात एमआयडीसी नसल्याने तरुण वर्गाच्या हाताला रोजगार मिळत नाही. यासाठी नोकरीच्या शोधात रहावे लागत आहे. भोरला शिरवळ एमआयडीसीजवळ असल्याने तरुणाई शिरवळच्या दिशेने धाव घेत आहे, परंतु या ठिकाणी कंत्राटदार पद्धतीने काम करावे लागत आहे. पगारही कमी असतो. यामुळे तरुणांचे लग्न जमण्यास उशीर होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.