राष्ट्रवादीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद – पवार

“त्या’ कार्यकर्त्यांनी बांधले हातात “घड्याळ’

बारामती -भाजपकृत देशावर आलेल्या संकटातुन देशाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला तरुणाईचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुणांची एकजूट देशावर आलेलं भाजपकृत अनागोंदी कारभाराचे संकट परतवून लावणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्‍त केले.

छात्रभारती विद्यार्थी संघटना, लोकभारती पक्ष, राष्ट्र सेवा दल व इतर समविचारी पक्षसंघटनेत राज्यभरात काम करत असलेले कार्यकर्त्यांनी लोकभारती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. अजिनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्‍ते अंकुश काकडे यांच्या मार्गदर्शखाली शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गोविंदबाग बारामती याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.

ऍड. अजिनाथ शिंदे म्हणाले की, फक्त शरद पवार पुरोगामी विचाराला न्याय देऊ शकतात हा ठाम विश्‍वास घेऊन असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करीत आहोत. देशात भाजप व शिवसेनेचे प्रतिगामी लोकांचे सरकार आहे. नियोजनशून्य नोटबंदी व शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती, शेतकरी व छोटे-मोठे उद्योग क्षेत्र रसातळाला गेले आहेत. अनेक नामांकित कंपन्या बंद पडल्यामुळे कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे बेरोजगारी वाढून उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सरकार असंवेदनशील असून जातीयवादी प्रवृत्तीने थैमान घातले आहे.

याप्रसंगी प्रमुख कार्यकर्ते पार्थ पोळके, रामदास निकम, देविदास हटकर, नितीन झिंझाडे, ऍड. प्रताप शेळके यांच्यासह पुणे, सातारा, धुळे, सोलापुसह राज्यातील दहा जिल्ह्यातील प्रमुख 500 ते 600 कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुशराव काकडे, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाबापू सातव, महाराष्ट्र प्रदेश सचिव ओबीसी विभाग राज पाटील, तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)