पुणे : दांडीया खेळणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या 19 वर्षीय तरूणाला तीन वर्षे सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली.
दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. आकाश बाबासाहेब गायकवाड (वय 19, रा. थेरगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी 5 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. ही घटना 14 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 9.45 च्या सुमारास थेरगाव परिसरात घडली.
पीडित एका मंडळाच्या कार्यक्रमात दांडीया खेळायला गेली होती. त्यावेळी तिच्या घरापशी चकरा मारणाऱ्या आकाश याने तिचा विनयभंग केला. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.