मसूर – डस्टर कार व ऊसाने भरलेला ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारचालक सचिन अंकुश अर्जुगडे (वय 28, रा. हनुमानवाडी, ता. कराड) जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री 10 च्या सुमारास मसूर-पुसेसावळी रस्त्यावर शामगाव घाटानजीक अंतवडी गावच्या हद्दीत झाला. डस्टर कार (क्र. एम. एच. 50 जी – 7077) पुसेसावळीहून मसूरकडे येत होती.
तर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एम. एच. 50 -2852) ट्रॉलीसह पुसेसावळीकडे निघाला होता. शामगाव घाटाच्या खाली उतारावर कार व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की कारच्या चालकाच्या बाजूचा चक्काचूर झाला. तर ट्रॅक्टरच्या मधल्या भागाचे दोन तुकडे झाले. या अपघातात सचिन अर्जुगडे हा जागीच ठार झाला. अपघाताची नोंद मसूर पोलिसात झाली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतिश मयेकर, गणेश भोसले, अमोल देशमुख तपास करीत आहेत. अपघातस्थळ धोकादायक असून उतारावरच अरुंद रस्ता असल्याने या जागेवर अनेक अपघात झालेले आहेत.