नेल्लूर – आंध्रप्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील एस. एस. पेटामध्ये सॅनिटायझर प्यायल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या भागाला कंटेन्मेंट घोषित केल्यानंतर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दुकांनाबरोबर दारूची दुकानेही बंद करण्यात आलेली आहेत. या युवकाला कुठेच दारू न मिळाल्याने त्याची बेचैनी वाढली. दारूची तीव्र इच्छा झाल्यामुळे त्याने चक्क सॅनिटायझरची बॉटल पिली. त्यामुळे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. सॅनिटायझर प्यायलामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देशातील कानाकोपऱ्यात घडल्या आहेत. अनेकजण अज्ञानामुळे सॅनिटायझर पीत असल्याचे समोर आले आहे. तर अनेकांनी दारूची तीव्र इच्छा झाल्यामुळे दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याच्याही घटना घडल्या आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर सहज उपलब्ध होत आहेत. सॅनिटायझरमध्ये बऱ्याच प्रमाणात अल्कोहोल वापरण्यात येते. शिवाय अनेक सॅनिटायझरचा वास दारू सारखाच तीव्र आहे.
याबाबत सरकारने जनजागृती करणे आवश्यक आहे, असे नागरिकांमधून मत व्यक्त होत आहे. सॅनिटायझर केवळ हातावरील विषाणूला नष्ट करण्यासाठी असून कुणीही सॅनिटायझर पिऊ नये, असे सरकारने सांगण्याची वेळ आली आहे.