भारतातल्या तरुणाईला उत्पादकतेपासून कोण रोखत आहे?

तरुण तगडा देश आज आर्थिक विकासात मागे का आहे?

– वरुण ग्रामोपाध्ये

मार्च 31, 2020 च्या वर्ल्ड-ओ-मिटर युनायटेड नेशन्स डेटा प्रमाणे भारताची लोक संख्या 1.381 बिलियन आहे. शाळा, महाविद्यालये आणी रोज नवनवीन होणाऱ्या अकॅडेमी वाढत्या विद्यार्थी संख्येने तुडुंब वाहत आहेत. भारताच्या नागरिकांचे सरासरी वय आज 29 असून सरासरी वार्षिक उत्पन्न 1 लाख 36 हजार रुपये आहे. त्याच वेळी वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारपर्यन्त संपूर्णणे कर मुक्त आहे.

जागतिक आपत्कालीन काळातही वाढ-विस्तारासाठी अनुकूल घटक भारतात आहेत आणि ते वाढतच जाणार आहेत. भारत हा वर्ष 2020 पर्यन्त “यंगेस्ट कंट्री’ होण्याचे भाकीत वर्ष 2012 मध्येच आयरिस फाऊंडेशनने केले होते. मग हा तरुण तगडा देश आज आर्थिक विकासात मागे का आहे? भारतातल्या तरुणाईला उत्पादकतेपासून कोण रोखत आहे?

वैयक्तिक घडणीच्या बाबतीत बहुतांश वेळा उत्पादकता विचारात घेतलीच जात नाही. आपला मुलगा/मुलगी डॉक्‍टर होइल का इंजिनियर यातच मौल्यवान वेळ, श्रम, आणि रक्कम वाया घालवली जाते. वाढत्या लोकसंख्येबरोबर आपले मुलदेखील एका मोठ्या गटाचा छोटासा हिस्साच होणार आहे, याची कोणीच काळजी घेत नाही, आणि शेवटी जेव्हा अनेक वर्ष डिग्री घेतल्यानंतर आपण स्वतः पायावर उभे राहण्याची वेळ येते, तेव्हा संतृप्त मागणी व वाढतच जाणारा पुरवठा पाहून खचून जायला होते. शिवाय, एवढे शिक्षण घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर मोठाच होत जातो. मोठ्या, श्रीमंत आणि बलाढ्य देशातही हेच होऊन अनेक भविष्यासाठी उपयुक्त तरुण पिढी निम्न-स्तरीय नोकरी करताना दिसते.

आज भारतात 1.5 मिलियन विद्यार्थी इंजीनीरिंगची परीक्षा देत आहेत, पण त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी खंबीर कंपन्या, आणि विक्रीयोग्य कौशल्ये या दोन्हीची कमतरता जोरदार चटका देवून जात आहे. या दुष्टचक्राचे इतर क्षेत्रात गांभीर्याने अस्तित्व जाणवत नसले तरीदेखील याच नुकसानदायी अनुकरणाचा वापर होत असणे आपण विसरता कामा नये. आपल्याला “लोक काय म्हणतील’, हे आधी मानसिक त्रासततेच्या कारणात प्रथम होतेच, पण आज आपल्या या विचारांचा पुढच्या पिढीवर आर्थिक दृष्टीकोनातून विपरीत परिणाम सातत्याने होत आहे.

भारताला आपले कालबाह्य विचार झटकून थेट प्रगतीच्या वाटेतील अडथळ्यांना नजरेला नजर देवून भिडण्यासाठी आजसारखी अनुकूल आणि सर्वत्र उपयुक्त परिस्थिति हे जणू या लॉकडाऊनचे वरदानच आहे. जग ठप्प झालेले असतानाही वाढती थेट परकीय गुंतवणूक, उत्पादन क्षेत्रास खासगी आणी सरकारी तज्ञांकडून दिवसेंदिवस मिळणारे प्रोत्साहन हे भारताच्या युवांसाठी सुवर्णसंधपेक्षा कमी नाही. कोणा दुसऱ्या तिसऱ्याचा विचार न करता आपल्या मोस्ट-प्रॉडक्‍टीव कामकाजाकडे सर्व लक्ष केंद्रित करणे हा, या सुपीक परिस्थितीतील सर्वोत्तम उपाय आहे.

  • वरुण ग्रामोपाध्ये

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.