लग्नानंतर अल्पवयीन मुलीची सांगलीतून सुटका

विमेन हेल्पलाइनची कामगिरी

पिंपरी (प्रतिनिधी) – तळेगाव येथील 14 वर्षीय मुलीचा 30 वर्षीय सांगलीतील तरुणाशी फुरसूंगी येथे जबरदस्तीने विवाह लावून दिला. याबाबत माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील विमेन हेल्पलाइनने पोलिसांच्या मदतीने सांगलीतून अल्पवयीन मुलीची पतीच्या घरातून सुटका करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 3) घडली आहे.

विमेन हेल्पलाइनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन आहे. वडिलांच्या त्रासाला कंटाळून आईने यापूर्वीच घर सोडले आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांनी एका 30 वर्षीय विवाहीत पुरुषासोबत तिचे जबरदस्तीने लग्न ठरविले. मुलीने तसेच तिच्या आत्याने त्यास जोरदार विरोध केला. मात्र वडिलांनी विरोधाला न जुमानता सोमवारी (दि. 2) सकाळी फुरसुंगी येथे मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत घरगुती पद्धतीने लग्न लावण्यात आले.

पीडित मुलीने झाल्या प्रकाराबाबत तिच्या एका मैत्रिणीला माहिती देत सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्या मैत्रिणीने याबाबत आत्याला कळवले. या प्रकाराची माहिती निता परदेशी यांच्या कानावर आली. परदेशी यांनी तातडीने सांगली जिल्हा पोलीस उपाधीक्षक कृष्णांत पिंगळे यांचा मोबाईल क्रमांक मिळविला. आणि घडलेली सर्व घटना त्यांच्या कानावर घालत तातडीने हस्तक्षेप करून पीडित मुलीची सुटका करण्याची विनंती केली.

पिंगळे यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी पीडित मुलीला शोधून काढले. तसेच तिच्या पतीला व त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली.
विमेन हेल्पलाईनने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनाही या घटनेची माहिती दिली. पिडित मुलगी आल्यावर तिची याबाबत फिर्याद घेतली जाईल व त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे वाघमोडे यांनी सांगितले.

विमेन हेल्पलाइन करणार शिक्षणाचा खर्च –
पीडित मुलीच्या इच्छेप्रमाणे तिला आत्याच्या ताब्यात देण्यात आले. पीडित मुलीने वडिलांच्या घरी जाण्यासाठी नकार दिला आहे. यामुळे तिच्या राहण्याची व पुढील शिक्षणाची जबाबदारी विमेन हेल्पलाईनने स्वीकारली आहे, अशी माहिती नीता परदेशी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.