- पाचशे रुपयांचे घड्याळ वीस हजार रुपयांना!
चऱ्होली – मोबाइल हातात आला अन् अनेक कामे ही घरबसल्या होऊ लागली. मोबाइलवर घरी बसून जेवणाच्या ऑर्डरपासून कपडे व अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदीसुद्धा बाहेर न पडता होऊ लागली. इंटरनेटमुळे मोबाइलवर येणाऱ्या अनेक ऑफर व बक्षिसांची भुरळ युवकांना पडली असून, यामुळे अनेकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याची बाब मोठ्या संख्येने बाहेर येत आहेत. अशाच एका बक्षिसाच्या आमिषाला बळी पडलेल्या भोसरीतील युवकाला ऑनलाइनचा चांगलाच धडा मिळाला आहे. पाचशे रुपयांचे मनगटी घड्याळ चक्क वीस हजार रुपयांना पडले असून शेवटी घड्याळ तर मिळाले नाहीच पदरी पडली फक्त निराशा व झालेली आर्थिक फसवणूक.
भोसरीत वास्तव्यास असलेला हा तरुण इलेक्ट्रीशियन म्हणून कामाला आहे. नेहमीच ऑनलाइन खरेदी करण्याची त्याची सवय त्याला चांगलीच अद्दल घडवून गेली. एका ऑनलाइन ऍपवरून त्याने पाचशे रुपयांचे मनगटी घड्याळ मागविले. तीन दिवसांनंतर त्याला एक फोन आला व तुम्ही घड्याळ ऑर्डर केली का? अशी विचारणा करण्यात आली. तरुणाने होकार देताच समोरून तुम्हाला चार चाकी गाडी बक्षीस म्हणून लागली आहे व ती सोडवून घ्या, असे सांगण्यात आले. मात्र युवकाने स्पष्ट नकार देत फोन कट केला.
मात्र सावज आपल्या हातून सुटते की काय म्हणून परत त्याच नंबरवरून युवकाला फोन आला व गाडी हवी नसेल तर गाडीची बारा लाख रुपये रक्कम आम्ही तुम्हाला दोन तासांत तुमच्या बॅंक अकाउंटला देऊ असे आमिष देण्यात आले. बारा लाख रुपये मिळणार समजल्यावर लालसेपोटी हा युवक अलगद त्यांच्या बोलण्यात फसला व खरा खेळ सुरू झाला.
बारा लाख रक्कम जमा करण्यासाठी तुमच्या खात्यात तीन हजार पाचशे रुपये प्रथम टाकण्यास सांगितले. युवकानेसुद्धा कुठलाही विचार न करता ऑनलाइन रक्कम त्यांना पाठवली. खाते उघडल्यावर बॅंकेचा मॅनेजर बोलतो असा दुसरा कॉल आला व आपल्या रकमेला टीडीएस व जिएसटी असे मिळून बारा हजार सहाशे रुपयांची मागणी युवकाकडे करण्यात आली.
दोन तासांत पैसे मिळणार म्हटल्यावर युवकाने त्याच्या मित्राला फोन करून पैसे उधार घेतले व पाठवून दिले. यामुळे लोकांना फसविणाऱ्या या टोळक्यांचे चांगलेच फावले व त्यांनी परत त्याला वेगवेगळ्या कारणावरून तीन हजार भरायला सांगितले. तोपर्यंत युवकाने एकोणीस हजार शंभर रुपये आपल्या खात्यातील रक्कम पाठवलीसुद्धा होती. मात्र वारंवार फक्त पैसे भरण्याचा तगादा लावल्याने हा युवक भानावर आला मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
आपली आर्थिक फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्याने पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयात धाव घेतली. सायबर गुन्हे शाखेत ऑनलाइन फसवणूक झाल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. वेळ बघण्यासाठी ऑर्डर केलेली घड्याळ मिळाले तर नाहीच मात्र तीच वेळ त्या युवकासाठी आर्थिक फसवणुकीसाठी घातक ठरली.
त्यामुळे युवकांनी अथवा नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशा फेक कॉलकडे लक्ष देऊ नये. कारण जगात फुकट कोणीच कोणाला काही देत नाही. त्यामुळे अशा आमिषांना बळी न पडता नागरिक जागृक होणे गरजेचे आहे.