पुणे : हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ च्या लोगोचे अनावरण युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष व हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा येत्या ७, ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पुण्यातील ऐतिहासिक स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राला नवा आयाम देणारी ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रतिभावान महिला व पुरुष मल्ल या स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य दाखवणार आहेत.
ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी खुली असून राज्यभरातील कुस्तीप्रेमींसाठी ती विशेष आकर्षण ठरेल. हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.