गोवा फिल्म फेस्टीव्हलमध्ये तरुणाईची कामगिरी लक्षणीय

"स्टील अलाइव्ह', "मेघमल्लार' आणि "लॉंग टाइम नो सी' ला उत्तम प्रतिसाद

पणजी : माझा चित्रपट आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या आणि त्यायोगे मानसिक जाणीव झालेल्या एका तरुण नायिकेची कथा सांगतो. नायिकेला आत्महत्या करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यापासून दूर पळून जायचे आहे; परंतु आपण आपल्या जीवनातील परिस्थितीपासून पळू शकत नाही, एका जाणीवेच्या मदतीने आपण त्याचा सामना केला पाहिजे आणि त्यातून सुखरूप बाहेर आले पाहिजे. गोवा येथे आयोजित 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरामा विभागात आज स्टील अलाइव्ह हा मनो-नाट्य लघुपट प्रदर्शित झाला त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते ओंकार दिवाडकर या चित्रपटा मागील प्रेरणेविषयी बोलत होते.

या चित्रपटातील मुख्य पात्र औदासीन्य आणि भावनिक गोंधळामुळे आत्महत्येचा प्रयत्न करते परंतु ती अयशस्वी होते आणि पुन्हा आपले आयुष्य जगू लागते. प्रेक्षकांनी माझा चित्रपट साक्षीदार म्हणून पहावा अशी माझी इच्छा आहे, यामुळे जागरूकता निर्माण होईल, असे दिग्दर्शक म्हणतात.
30 मिनिटांच्या या मराठी चित्रपटात 27 मिनिटांचा अनकट शॉट आहे. त्याविषयी बोलताना दिवाकर म्हणाले की, आत्महत्या करण्याच्या वृत्तीने झपाटलेल्या त्या व्यक्तीचा प्रवास दाखवणे आवश्‍यक होते.

“मेघमल्लार’ ही पूर्व पाकिस्तान मधील प्रत्येक कुटुंबाची युद्ध-कथा
बांगलादेशात आम्ही 1971 च्या स्वातंत्र्य युद्धाला लोकांचे युद्ध असे संबोधतो. माझा चित्रपट “मेघमल्लार’ हा युद्धकाळातील एका छोट्या शहरातील कुटुंबाच्या संघर्षाची कथा आहे. असे बांगलादेशी चित्रपट दिग्दर्शक जाहिदूर रहीम अंजान यांनी सांगितले. या स्वातंत्र्य युद्धात प्रत्येक कुटुंबाने योगदान दिले आहे, आमच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना, असल्याचे बांगलादेशचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता शाहिदुझमान सलीम यांनी सांगितले.

प्रसिद्ध कादंबरीकार अख्तरुझमान इलियास यांच्या एका छोट्या कथेवर आधारित, मेघमल्लार हा चित्रपट एका सामान्य कुटुंबातील अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीतील जीवन-परिवर्तनाचे अनुभव कथन करणारी शोककथा आहे. हा चित्रपट माझ्या देशाचे सौंदर्य देखील दर्शवितो, असे अंजान म्हणाले. आपली पिढी ही युद्धानंतरची पिढी आहे, ज्यांनी युद्ध पाहिले नाही; या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही युद्धातील वास्तविक परिस्थिती पाहू आणि त्याचा अनुभव घेऊ शकता, असे असे बांगलादेशची राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री अपर्णा घोष म्हणाली. तिने या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे.

“लॉंग टाइम नो सी’हा चित्रपट दोन व्यक्तींच्या जीवनातल्या बारकाव्यांची कथा
“लॉंग टाइम नो सी’ सारख्या चित्रपटांचे चित्रीकरण वास्तविक स्थळीच केले पाहिजे, स्टुडीओमध्ये वास्तवाला मर्यादा असतात: दिग्दर्शक पियर फिल्मन
विभक्त झाल्यानंतर ते नऊ वर्षांनी भेटले होते. त्यांचा प्रवास सुरुवातीपासून आठवण्यासाठी,त्यांच्या आयुष्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी,त्यांचे सत्य,खेद आणि आठवणींचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे 80 मिनिटे होती. थोडक्‍यात, “लॉंग टाइम नो सी’या फ्रेंच चित्रपटाच्या कथेचे वर्णन याप्रमाणे केले जाऊ शकते.

पियर फिल्मन द्वारा दिग्दर्शित ‘लॉंग टाइम नो सी’हा चित्रपट दोन व्यक्तींच्या जीवनात घडलेल्या बारकाव्यांची कथा आहे,थोड्या काळासाठी का नाही पण भूतकाळात हे दोघे एकमेकावर जीवापाड प्रेम करायचे आणि अगदी अनपेक्षितरित्या नऊ वर्षा नंतर ते रेल्वे स्टेशनवर भेटले आणि त्यांच्याकडे केवळ80मिनिटे होती. या चित्रपटाची पटकथा देखील पियर फिल्मन यांनी लिहिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.