पाचगणी – शिवसेना भवनाविषयी वल्गना करणाऱ्या भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा समाचार घेताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत ‘शिवसेना भवना’ कडे तिरक्या नजरेने बघण्याच तुमचं धाडस होणार नाही, अशी घणघाती टीका केली. प्रसाद लाड यांनी त्याच्या वक्तव्याविषयी माफी मागितली असली तरी बेताल वक्तव्याबद्दल गृहराज्यमंत्री म्हणाले, ‘लाड त्याच्या विधानावर स्थिर राहिले असते तर त्याचे परिणाम त्यांनी महाराष्ट्रभर पाहिले असते.’
गृह राज्यमंत्री देसाई महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर हिरडा नाका येथे पत्रकार परिषद झाली. महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानीबाबतीत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या . कोणत्याही परिस्थितीत दळणवळण सुरु करा, दुर्गम व डोंगराळ महाबळेश्वर तालुक्याच्या मदतीकरीता सरकार संवेदनशील असून संवेदनशील मुख्यमंत्री दिवसातून सातारा जिल्ह्याची परिस्थितबाबत विचारपूस करत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मदत नक्कीच मिळणार, अशी माहीती त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाअध्यक्ष यशवंत घाडगे, माजी शिवसेना जिल्हाअध्यक्ष राजेश कुंभारदरे, शिवसेना नेते डी. एम. बावळेकर , युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे , शिवसेना शहरप्रमुख राजू गुजर, शिवसेना कार्यकर्ते जितेश कुंभारदरे, नाना साळुंखे आदी उपस्थित होते.