अभिनेत्री काजल अग्रवालने नुकतेच उद्योजक गौतम किचलूशी लग्न केले. लग्नानंतर हे दोघेही हनिमूनसाठी मालदीवच्या अंडरवॉटर हॉटेल व्हिला ‘द मुरका’ मध्ये थांबले होते. या हॉटेलच्या खोलीची सुंदर छायाचित्रे काजलने तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहेत. या हॉटेलच्या खोलीचे एक रात्रीचे भाडे इतके महाग आहे की ऐकून तुम्हाला घेरी येऊ शकते.
जगातील पहिले अंडरवॉटर हॉटेल व्हिला –
मुराका हे जगातील पहिले पाण्यातील हॉटेल व्हिला आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये हे अनोखे हॉटेल सुरू झाले. हे मालदीवमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 16 फूट खाली बांधले गेले आहे. हिल्टनन्स कॉनकार्ड मालदीव रंगली आयलँड रिसॉर्ट अंतर्गत मुराकाची किंमत 15 दशलक्ष डॉलर्स आहे. या हॉटेलच्या व्हिलाच्या खोलीतून समुद्राच्या वर आणि खाली सर्व काही स्पष्ट दिसते. त्याचे एका रात्रीचे भाडे 50 हजार डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात तब्बल 37 लाख रुपये इतके आहे.
दुमजली व्हीला –
हॉटेलच्या मुख्य रिसॉर्टमधून अतिथी खासगी सीप्लेन, खाजगी जेट किंवा स्पीड बोटचा वापर करुन या हॉटेल व्हिलामध्ये पोहोचू शकतात. पाहुणे आपल्या व्हीलामध्ये मुक्काम संपेपर्यंत या बोटी स्वतःसोबत ठेवू शकतात. हे दुमजली व्हिला स्टील, काँक्रीट आणि एक्रेलिकचा बनलेले आहे. व्हिलामध्ये दोन बेडरूम, एक जिम, स्नानगृह इ. सुविधा आहेत.