नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदार सर्वाधिक मतदान करून आशीर्वाद देतील. उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड जनसमुदाय उपस्थित असल्याने जनतेची खंबीर साथ लाभणार असल्याचे भाकित महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले आहे.
जुन्नर तालुक्यात केलेल्या विकासकामांमुळे महाविकास आघाडीतील अनेक जुने जाणते नेते, कार्यकर्ते व स्व. वल्लभ बेनके यांच्यावर प्रेम करणारी तालुक्यातील जनता माझ्याबरोबर आहे.
मागील पंचवार्षिक काळात करोनाचा काळ व झालेल्या राजकीय घडामोडींमुळे अवघे अडीच वर्षच तालुक्यातील विकासकामांसाठी मिळाला. त्यामुळे अपूर्ण राहिलेली तालुक्यातील अनेक विकासकामे पुढील काळात जनतेच्या आशीर्वादाने मार्गी लावणार असे नमूद केले.
भावनिक लाट नाही – आमदार बेनके
लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीची परिस्थिती बदलली असून लोकसभेच्या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीवर कुठलाही भावनिक परिणाम होणार नाही. विधानसभा निवडणुकीत कुठलीही भावनेची लाट नसून तालुक्यातील जनता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतील, असा ठाम विश्वास आहे.
जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याला प्रथमच सर्वाधिक कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे मागील पंचवार्षिक काळात जनसामान्यांसाठी, विविध जाती-धर्मांसाठी, शेतकर्यांसाठी, युवक-युवतींसाठी अनेक योजना व विकासाची कामे करता आली आणि ती जनतेने बघितली आहे.
जनता भक्कमपणे पाठीशी उभी – बेनके
मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सतत तालुक्यातील जनतेच्या संपर्कात असल्याने ग्रामीण भागातील प्रश्नांची मला जाणीव आहे. त्यामुळे जनतेचा थेट संपर्क असल्याने मी अनेक प्रश्न मार्गी लावू शकलो.
विकासकामे करताना विरोधकांचा द्वेष न करता भरघोस निधी उपलब्ध करून विकासाची कामे केली. तालुक्यातील सरपंच, कार्यकर्ते, मतदार व सुजाण नागरिकांनी बेनके यांनी केलेले काम बघितले आहे. त्यामुळे प्रचार दौरे करत असताना तालुक्यातील जनता भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी असल्याची जाणीव असल्याचे आमदार बेनके यांनी नमूद केले.