जामखेड -करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आपला जीव धोक्यात घालत कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही नागरिक संचारबंदीमध्ये विनाकारण घराबाहेर पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील नगररोड, बीड रोड, जयहिंद चौक, बीड कॉर्नर येथून प्रवेश करताना रस्त्यांवर जनजागृतीपर संदेश रेखाटले आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा शहरातील अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. महसूल प्रशासन, नगरपरिषद, जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचारी वारंवार कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत आहेत. मात्र, पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांच्या पुढाकारातून जामखेड नगरपरिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर सामाजिक संदेश लिहित लोकांची जनजागृती करण्यात येत आहे.
शहरातील नगररोड, बीड रोड, बाजार समिती, जयहिंद चौक, बीड कॉर्नर या ठिकाणी आपण खरचं कामानिमित्त बाहेर पडताय का?, विनाकारण फिरत असाल, तर कुटुंब आणि शहराला धोक्यात आणत आहात, तुम्ही बाहेरून येणार, करोना घरी घेऊन जाणार, घरात राहू या, करोना टाळूया, असे लिहित सर्वसामान्य नागरिकांना घरातच राहा आणि प्रशासनास सहकार्य करा, असे सूचित केले आहे. जामखेड शहरात तीन करोनाबाधित रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवत घरातच राहणे, आता गरजेचे बनले आहे.