तुम्हाला योद्धा म्हणून ओळखले जाईल

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून संघाचे कौतुक

ब्रिस्बेन – भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंचे कौतुक करताना ड्रेसिंगरूममध्ये तीन मिनिटांचे भाषण केले.

दुखापतीने त्रस्त असलेल्या भारतीय संघाने चौथ्या कसोटीसह ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकाही जिंकली.
जे धैर्य तुम्ही दाखवले, ते अवर्णनीय आहे. जखमा झेलल्या, संघ केवळ 36 धावांत बाद झाला. अशी बिकट स्थिती असूनही तुम्ही मागे वळून पाहिले नाहीत. स्वत:वर विश्‍वास दाखवला, मालिका विजय हे त्याचेच हे फळ आहे. हा आत्मविश्वास रातोरात आला नाही. या आत्मविश्वासाने संघ नव्याने उभा राहिला. तुमचा खेळ तुम्ही दाखवला. त्यामुळे आज केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग तुम्हाला सलाम करते आहे, असे गौरवोद्‌गार शास्त्री यांनी काढले.

आज तुम्ही जो पराक्रम केला आहे, तो नेहमी लक्षात ठेवा. या क्षणाचा आनंद लुटा. हा क्षण तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका, असा सल्लाही शास्त्रींनी दिला. तसेच चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, शुभमन गिल यांचेही कौतुक केले.

ऋषभला तर तोड नाही. तू ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्यावेळी काही क्षण अनेकांना हे स्वप्नवतच वाटत होते. तुझ्यावर जी जबाबदारी होती ती तू भक्कमपणे निभावलीस. आपण ज्या दयनीय स्थितीत होतो, त्या स्थितीतून रहाणेने कल्पक नेतृत्व केले, असे सांगून शास्त्री यांनी टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर यांचेही अभिनंदन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.