जामखेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्ती (देवदैठण), केंद्र. तेलंगशी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर या दुर्गम व ग्रामीण भागातील शाळेत शिकणारी कु. सरल लहू बोराटे (इ.२री ) हिने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल (१ली व २री ) गटातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता खूप ठासून भरलेली आहे. लेकरांमध्ये प्रचंड क्षमता आहेत. गरज आहे त्या क्षमतांना विकसित करण्याची, त्यांना वाट निर्माण करून देण्याची.
धनगरवस्ती शाळेच्या इतिहासातील हे पहिलंच बक्षीस…. दुर्गम भागातील वस्तीवरील ही दुर्लक्षित शाळा. बंद पडण्याचे अवस्थेत पोहोचलेली. आज या शाळेतील लेकरं स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या क्षमतांना चॅलेंज देत आहेत. असं म्हणतात खडतर व बिकट परिस्थितीमध्येच समृद्धतेचे अंकुर फुलत असतात.
कु. सरल इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकते. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ती खूप छान प्रगती करत आहे. हस्ताक्षरासोबत वक्तृत्व, समाजभान, व्हिडिओ शूटिंग, मैत्रीची भावना, सर्वांसोबत सहकार्याने व प्रेमाने वागणे, सतत आनंदी राहणे, आपली काम वेळच्यावेळी करणे असे अनेक गुण तिच्यामध्ये आहेत. मागील वर्षीही सरल जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाली होती तेव्हा तिचा क्रमांक आला नव्हता. तिच्या चेहऱ्यावर मात्र निराशेचा यक्तींचीतही भाव नव्हता. यावर्षी जिल्ह्यात प्रथम आली तरीही तिच्या चेहऱ्यावरील भाव तोच शांत व संयमी. असं म्हणतात यश मिळाल्यानंतर हुरळून जाऊ नये व अपयश आल्यानंतर खचून जाऊ नये.
आपलं जीवन विण्याच्या तारेप्रमाणे वितराग असावं. ज्यामधून जीवन संगीताचा सुमधुर स्वर चोहीकडे घुमत रहावा. माणूसपणाचा सुगंध दरवळत राहावा. असंच सरलचं काहीसं आहे. बाळा सरल शिक्षक म्हणून बाप म्हणून तुझा प्रचंड अभिमान आहे. बापाच्या वाढदिवसानिमित्त तू तुझ्या कर्तुत्वाचं दिलेलं हे गिफ्ट खूप मोठं आहे. तू समृद्ध होताना तुला पाहून मन खूप भरून येत आहे. पोरी खूप मोठी हो चांगली माणूस बन एवढीच अपेक्षा. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
गुणवत्ता कधीच कोणाची रखेल नसते. जे परिश्रम घेतात, स्वतःची स्पर्धा स्वतःशी करतात, ज्यांचा ध्यास उत्कृष्टततेसाठी असतो, ती माणसं कधीच हरत नसतात. ती रोज जिंकतात काल व आजची त्यांची प्रगती पाहिली की त्यांच्या विजयाचा सुगंध दरवळायला लागतो. काल जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेनिमित्त अनेक मित्रांच्या शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या भेटी झाल्या. मनापासून आनंद होतो आहे की अनेक हात, मनं व माणसं परिवर्तनासाठी, चांगल्या गोष्टींसाठी ग्रामीण भागातील लेकरांच्या भवितव्यासाठी धडपडत आहेत. स्वतःला सिद्ध व समृद्ध करण्यासाठी लेकरं मनापासून प्रयत्न करत आहेत.
जिल्हा परिषद अहिल्यानगरचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी महोदय, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी साहेब, प्रशासनातील इतर सर्व अधिकारी वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांचे मनापासून कौतुक करावसं वाटतं सर्वांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. लेकरांनी ही मेहनत घेऊन आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दिला.
जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण भागातील लोकांचा व लेकरांचा श्वास आहे. आपली सर्वांची जबाबदारी आहे हा श्वास आपल्याला क्षीण होऊ द्यायचा नाही. हा अखंडपणे व अविरतपणे चालू राहीला तर ग्रामीण भागातील लेकरांचे शिक्षण व गुणवत्ता जिवंत राहणार आहे.