नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मागच्या पाच महिन्यांपासून देशात काही ठिकाणी कडक तर काही ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता देत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त हाल होता आहेत ते म्हणजे पोटावर हात असणाऱ्या लोकांचे…या लोकांना सध्या आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी धडपड करावी लागत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक फळविक्रेता महिला आपली फळांची गाडी वाचवण्यासाठी आटापिटा करत आहे. मात्र यातही खास गोष्ट आहे ती म्हणजे ही फळविक्रेता असणारी महिला हि एक पीएचडी धारक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Wow! Indore veggie vendor Raisa Ansari speaking fluent English to protest over the 'left-right' shop opening scheme of IMC. She also claimed to be a Masters in Physics from DAVV in 2011. pic.twitter.com/vSYQqpo6ID
— Adil Khan (@Aazadadil) July 22, 2020
मध्यप्रदेशच्या इंदूरमधील बाजारपेठेतील महिला फळ विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉ.राईसा अन्सारी असे या फळविक्रेत्या महिलेचे नाव आहे. ही महिला व्हिडिओमध्ये प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप घेत आहे. कारण प्रशासनाकडून बाजारपेठे संबंधीचे निर्णय आणि नियम रोज नव्या पद्धतीने सांगण्यात येत असल्याचा आरोप अन्सारी यांनी केला आहे. परंतु, हे सर्व आरोप त्यांनी अस्खलित इंग्रजीतुन केले आहेत त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. इंदूरच्या अहिल्याबाई विद्यापीठातून पीएचडी घेतल्याचा दावा डॉ.राईसा अन्सारी यांनी केला आहे.
दरम्यान, व्हिडिओमध्ये राईसा या आपली फळांची गाडी काढून घेण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना इंग्रजीमधून जाब विचारताना दिसत आहेत. पालिका अधिकारी त्यांना विनाकारण त्रास देतात अशी त्यांची तक्रार आहे. फळविक्री करण्यासंबंधी पालिका अधिकारी हे रोज त्यांच्या जागा बदलतात त्यामुळे आम्हा सर्वांची मोठी गैरसोय होते. कधी कधी तर फळविक्री करायची नसल्याचे सांगून सगळे स्टॉल आणि हातगाड्या जप्त करत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या सर्व त्रासाला कंटाळून त्यांनी पंतप्रधानांच्या घरी जावे कि कलेक्टरच्या घरी जाऊन आम्ही जीव द्यावा का असा संतप्त सवाल देखील केला आहे.