पिंपरी – औद्योगिक वसाहतींमध्ये करोना वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आक्षेप घेतले जात आहेत. यावर उद्योजकांनी ठाम मत व्यक्त केले असून दिवसभर आमचे कामगार कारखान्यातच असतात, ते बाहेर फिरत नाहीत. लॉकडाऊन लादण्यापेक्षा औद्योगिक वसाहतींमध्ये पाच-सहा लसीकरण केंद्रे उघडा. सर्व कामगार आणि उद्योजकांना लस द्या, आम्ही त्याचे शुल्क देण्यास तयार आहोत, असे आवाहन महापालिका आणि प्रशासनाकडे केले आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, कामगार हा बाहेर रस्त्यावर विनाकारण फिरत नाही. तो त्याचे काम करत असतो. लॉकडाऊन लावल्याने सर्वांचेच हाल होतील. त्याऐवजी औद्योगिक वसाहतींमध्ये पाच-सहा लसीकरण केंद्रे सुरु करा आणि सर्व उद्योजक व कामगारांना सरसकट लस द्या. उद्योजक त्याचे शुल्क देण्यास तयार आहेत. आम्ही मोफत लस मागत नाही. पहिल्या लॉकडाऊनमध्येच उद्योगांचे आणि कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी लसीकरणाला तोडगा म्हणून स्वीकारा.