…तरीही तुझ्यात जीव गुंतला!

मयूर सोनावणे

“ती’ ना माझ्या वर्गात होती, ना माझ्या शाळेत, ना होती माझ्या गावात. प्रेमात पडण्यासाठी सहवास महत्त्वाचा असतो, असं म्हटलं जातं; पण तस काही नव्हतं तरीही ती माझ्या आणि मी तिच्या प्रेमात पडलो. त्याला निमित्त ठरलं मोबाइलमधील शेअर चॅट ऍप्लिकेशन.

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तसं त्यावेळी मला मोबाइलचं फारसं वेड नव्हतं; पण सुट्टी असल्याने वेळ जात नव्हता, त्यापूर्वी एक-दोन दिवस आधी एका मित्राने शेअर चॅट नावाचं ऍप्लिकेशन माझ्या मोबाइलमध्ये डाउनलोड केलं होतं. त्यावर तो टाइमपास करत होता, म्हणजे अनोळखी व्यक्तींशी संवाद साधत होता. त्यानं सांगितल्याप्रमाणं मीही टाइमपास करत बसलो होतो.

“व्हॅलेंटाइन डे’ जवळ आला होता. सुरुवातीला काही मुले चांगली बोलली; पण मी मुलगा आहे, हे सांगितल्यावर एका मुलानं शिवीगाळ केली. थोडंस विचित्र वाटलं म्हणून मोबाइल बंद केला आणि झोपायला गेलो; पण झोप येईना. मग, पुन्हा तोच टाइमपास सुरू, कधी मुले तर कधी मुली भेटल्या शेअर चॅटवर. जवळपास आठवडाभर चांगलाच गुरफटलो की त्यात! दुसऱ्या आठवड्यातली साप्ताहिक सुट्टी आली. सुट्टी म्हटलं की काही काम नाही. सकाळी नाश्‍ता झाला की, माझा शेअर चॅटवर खेळ सुरू झाला. कधी नव्हे ते त्या दिवशी शेअर चॅट ओपन केल्यावर सर्वप्रथम एका मुलीच्या मेसेजने संवाद सुरू झाला.

हाय, हॅलो, तुझं नाव काय? ती म्हणाली पूजा. मग, तिनेही विचारलं तुझं काय नाव? तसं माझं नाव वैभव होतं; पण मी मुद्दामच तुषार सांगितलं. म्हटलं चुकून मुलगा असला आणि परत शिव्या दिल्या तर…? मग, पुढचा मेसेज आला, काय करतोस? मी म्हटलं नोकरी. तू काय करतेस, या माझ्या प्रश्‍नावर तिचंही तेच उत्तर होतं. त्यानंतर तिने मला “प्रोफाइल शो कर’ असा मेसेज टाकला. मी म्हटलं आधी तू शो कर बरं प्रोफाइल. आधी तू, आधी तू असा खेळ थोडा वेळ रंगला. मग, तिनेच तिचं प्रोफाइल दाखवलं.

तेव्हा तिचंही नाव खोटंच होतं, तरीही त्यात आनंद होता, कारण की ती मुलगी होती. नाही तर अनेकदा मुलेच मुलींच्या नावांवर बोलत असतात, मज्जा म्हणून पोरांची खेचतात. हा गमतीचा भाग आहे, पण असो! तिनं प्रोफाइल शो केल्यावर समजलं तिचं नाव अश्‍विनी होतं. त्यानंतर तिचा मेसेज होता, कसला खोटारडा आहेस रे, नाव वैभव आहे आणि तुषार सांगितलंस ना. तू तरी कुठं खर सांगितलंस, असं मी म्हटलं. मी तरी काय कमी पडतोय होय!

त्यानंतर जवळपास एक आठवडा आमच्या गप्पा झाल्या. त्यावेळी वाटलं नव्हतं की, आमच्या प्रेमाचे सूत जुळेल; पण त्यानंतर तिने विचारलेला प्रश्‍न होता की, तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? अशा वेळी कोण म्हणेल की, मला मैत्रीण आहे म्हणून! तुमच्या मनात जो विचार आता आला असेल ना, तेच माझं उत्तर होतं. तिने पुढील दोन दिवस हाच प्रश्‍न विचारून पार चोथा करून टाकला होता; पण मीही माझ्या उत्तरावर ठाम राहिलो बरं.

त्यानंतर तिने पुढाकार घेऊन विचारल की, माझा बॉयफ्रेंड होशील का? माझा विश्‍वास बसत नव्हता; पण ते तिचे केवळ शब्द नव्हते तर भावना होत्या, हे फोनवरून प्रत्यक्ष बोलल्यावर जाणवलं. आता आम्ही मेसेजवरून कॉलवर आलो होतो. अगदी तासन्‌तास बोलत बसायचो. त्यामध्ये आमच्या भेटीचं नियोजन झालं आणि प्रत्यक्षात भेटही झाली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत, हे सांगावं लागलं नाही आणि आम्ही व्यक्तही झालो नाही, आज जवळजवळ तीन वर्षे होत आली आहेत.

संवाद सुरू आहे. अधूनमधून भेटीही होतात. दोघांमध्ये प्रेमाचं, विश्‍वासाचं अतूट नातं निर्माण झालंय. अजून पुढे बराच प्रवास करायचाय. पुढं काय होणार, हे माहिती नाही. हे सारं आठवायचं कारण म्हणजे, आज, 14 फेब्रुवारी, “व्हॅलेंटाइन डे’ आहे. जगभरातल्या प्रेमी-प्रेमिकांचं एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस!

Leave A Reply

Your email address will not be published.